नांदेड Maratha Reservation Suicide :मराठा आरक्षणाची मागणी राज्यभरातून होत असताना मोठी बातमी समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील मरळक येथील एका तरुणानं विष प्राशन करुन आत्महत्या केली. दाजीबा रामदास कदम (वय 25) असं मृत तरुणाचं नाव असून आत्महत्यापूर्वी त्यानं राज्य सरकारच्या निषेधार्थ चिठ्ठी लिहून ठेवली होती. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील हा चौथा बळी ठरलाय.
पोलिसांना सापडली सुसाईड नोट :दाजीबा कदम या तरुणानं 11 नोव्हेंबरला विष प्राशन केल्यानंतर त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान (13 नोव्हेंबर) त्याचा मृत्यू झाला. त्याच्याजवळ एक सुसाईड नोटही आढळून आली. या सुसाईड नोटमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळं आत्महत्या करत आहे, असा मजकूर लिहिण्यात आला होता. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे. दाजीबाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय.
दाजीबा करत होता स्पर्धा परीक्षेची तयारी :दाजीबा कदम हा मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाला होता. तसंच तो सैन्य भरती आणि पोलीस भरती परीक्षेची तयारी करत होता. मात्र, आरक्षण नसल्यामुळं दाजीबा काही करू शकला नाही. तसंच त्याच्या वडिलांनी त्यांची दीड एकर शेती विकली होती, असं मृत दाजीबाच्या भावानं सांगितलंय. तसंच शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करू, असं तहसीलदार विजय आवधान यांनी सांगितलं. मराठा आरक्षणावर तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी मराठा समाजाचे पदाधिकारी विठ्ठल पावडे यांनी केली आहे. दरम्यान, या घटनेमुळं पुन्हा एकदा राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.
हेही वाचा -
- Maratha Reservation Suicide : मराठा आरक्षणासाठी तब्बल 'इतक्या' आत्महत्या; मराठवड्यात प्रमाण जास्त
- Maratha Reservation : आरक्षणाच्या मागणीवरून आणखी एक आत्महत्या, मराठा समाज आक्रमक
- Maratha Reservation Live Updates : 'आम्ही जातो आमच्या गावा.. आमचा रामराम घ्यावा' असं लिहित मराठा तरुणाची आत्महत्या