नांदेड : Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार झपाटून कामाला लागलं आहे. मराठवाड्यात कुणबी समाजाची नोंद कुठे-कुठे आहे? याचा शोध घेण्यासाठी महसूल आणि शिक्षण विभाग कामाला लागलं आहे. शिक्षण विभागानं नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ९७८ शाळांमधील १४ लाख निर्गम उतारे आणि शाळा सोडल्याचे दाखले तपासले आहेत. त्यात तब्बल ४० हजार ६९१ प्रमाणपत्रांवर कुणबी असल्याची नोंद आढळून (Kunbi Caste Certificate) आली आहे. एकूण ३ हजार ७४० शाळातील रेकॉर्ड तपासणीनंतर हा आकडा काही लाखांच्या घरात जाण्याची दाट शक्यता आहे.
महसूल आणि शिक्षण विभाग कामाला लागले : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर राज्यभरात आरक्षणासाठी आंदोलन पेटलं (Maratha Reservation Protest) आहे. त्यामुळं राज्य शासनाची मोठी गोची झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसीत समावेश करण्याची मागणी केली आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ उपसमितीनं मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत मराठा समाजाची कुणबी म्हणून असलेल्या नोंदी शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महसूल आणि शिक्षण विभाग कामाला लागले आहेत.
४० हजार ६९१ प्रमाणपत्रांवर 'कुणबी' अशी नोंद : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं बुधवारी दुपारपर्यंत २७८ शाळांमधील १४ लाख निर्गम उतारे आणि शाळा सोडल्याचे दाखले तपासले होते. त्यात ४० हजार ६९१ प्रमाणपत्रांवर कुणबी असल्याची नोंद आढळून आली आहे. जिल्ह्यात ३ हजार ७४० शाळा असून, उर्वरित शाळातील नोंदी तपासण्याचे काम उशिरापर्यंत चालणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दिली. त्यामुळं कुणबी अशी नोंद असल्याची संख्या लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे सर्व रेकॉर्ड जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहेत.
महसूल विभागाकडून तपासणी :महसूल विभागाकडून 'कुणबी'च्या नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी कोतवाली बुक, जन्म- मृत्यू प्रमाणपत्र, सातबारा, शेती खरेदी-विक्री दस्तऐवज, लग्न नोंदणी प्रमाणपत्र (ज्यांची लग्न मराठवाडा-विदर्भ असे झाले असेल त्या जोडप्यांची लग्नपत्रिका, दोघांचे शाळा सोडल्याचे दाखले), तसेच निजामकालीन किंवा त्यानंतरचा 'कुणबी' नोंद असलेल्या दस्तऐवजांचा शोध घेण्यात येत आहे.
हेही वाचा -
- Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; जरांगे पाटील आंदोलन मागे घेणार?
- OBC leaders on Maratha quota : मराठा ओबीसी आरक्षणाबाबत ओबीसी नेत्यांची काय आहे भूमिका? जाणून घ्या सविस्तर
- Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी 'एल्गार'; २०० गावांनी घेतला 'हा' मोठा निर्णय