नांदेड :विकास शर्मा हे टाईल्स आणि मार्बलचे व्यापारी आहेत. त्यांच्याकडे गेल्या दीड वर्षापासून प्रदीप शंकरलाल स्वामी हा नोकर कामाला होता. परंतु काही दिवसापूर्वीच शर्मा यांचा प्रदीपच्या भावासोबत वाद झाला होता. त्याचा राग प्रदीपच्या मनात होता. त्यातून त्याने मालकाच्याच घरी दरोडा टाकण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने राजस्थानमधून इतर तिघांना बोलावून घेतले. त्यांना मालकाच्या घरात लाखो रुपयांचा ऐवज असल्याची माहिती दिली. ठरल्यानुसार शुक्रवारी सकाळी पाचही जण वेदांतनगर भागात आले. त्यातील तिघे हे घरात गेले. तर दोघे जण बाहेर टेहळणी करत होते.
शस्त्राचा धाक दाखवत चोरी :यावेळी आरोपींनी शर्मा यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाला खंजर लावून ८० हजार रुपयांचे मंगळसूत्र काढून घेतले. तसेच कपाटातील पैसे काढण्यास सांगितले. तोच घराबाहेर गोंधळ सुरु झाला होता. त्यामुळे बाहेर थांबलेले दोघे जण अगोदरच पळाले. तर गोंधळाचा आवाज ऐकून तिघांनीही धूम ठोकली. शर्मा यांच्या पत्नीने लगेच ११२ डायल करून माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलविली. वेदांतनगर आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. तिघे जण संशयितरीत्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना पकडून अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे मंगळसूत्र आणि खंजर आढळून आले. त्यानंतर या गुन्ह्यातील अन्य दोघांनाही पकडले. त्यात प्रदीप शंकरलाल स्वामी, पवनकुमार रामराम जाठ, राजेंद्रकुमार सुरेशकुमार जाठ, पंकज शंकरलाल स्वामी आणि मनीष नेमीचंद सेन अशी आरोपींची नावे आहेत.