महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडच्या शेतकऱ्यांनाही 'धर्मा पाटील' बनायला भाग पाडू नका - अशोक चव्हाण

नांदेडमधील बुटीबोरी-तुळजापूर या ३६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावरील अर्धापूर, हदगाव व लोहा तालुक्यातील संपादित करण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनींना वाढीव मोबदला तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे. अन्यथा त्यांनाही धर्मा पाटीलचा मार्ग पत्कारावा लागेल, असेही ते यावेळी म्हणाले.

नांदेडच्या शेतकऱ्यांनाही धर्मा पाटील बनायला भाग पाडू नका - अशोक चव्हाण

By

Published : Aug 8, 2019, 3:19 PM IST

नांदेड -जिल्ह्यातुन जाणार्‍या बुटीबोरी-तुळजापूर या ३६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावरील अर्धापूर, हदगाव व लोहा तालुक्यातील संपादित करण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनींचा वाढीव मोबदला तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. नांदेड येथे त्यांनी जिल्हाधिकार्‍यांची एका शिष्टमंडळासह भेट घेतली.

नांदेडच्या शेतकऱ्यांनाही धर्मा पाटील बनायला भाग पाडू नका - अशोक चव्हाण

शासकीय स्तरावर होणार्‍या दिरंगाईमुळे शेतकर्‍यांमध्ये निराशाची भावना तयार झाली आहे - अशोक चव्हाण

२०१८ मधील नागपूर येथे झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जिल्ह्यातील आमदार वसंतराव चव्हाण यांनी राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांची भेट घेवून वाढीव मोबदला देण्याची प्रक्रिया गतीमान करण्याची मागणी केली होती. दरम्यान २३ जुलै २०१८ रोजी राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून या अनुषंगाने शासन नियमानुसार योग्य ती कारवाई करावी, असे सुचित केले होते. परंतू शासकीय स्तरावर होणार्‍या दिरंगाईमुळे शेतकर्‍यांमध्ये निराशाची भावना तयार झाली आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन संपादित होणार्‍या हदगाव, अर्धापूर आणि लोहा तालुक्यांच्या परिसरात गेल्यावर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यंदाही अद्याप पुरेसा पाऊस झाला नसून अनेकांच्या पेरण्या वाया गेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. भूसंपादनाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे गेल्यावर्षी धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या वयोवृध्द शेतकर्‍याने मंत्रालयात विष प्राशन करुन आत्महत्या केली. यासोबतच अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे ६ शेतकर्‍यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. अशी परिस्थीती नांदेडच्या शेतकऱ्यांवर येई नये असे चव्हाण यावेळी म्हणाले.

आर्थिकदृष्ट्या बिकट परिस्थितीत सापडलेल्या शेतकर्‍यांचा शासनाने अधिक अंत पाहू नये. जी घटना धर्मा पाटील व अकोल्याच्या ६ शेतकर्‍या संदर्भात घडली तीच घटना जर मोबदला देण्यास विलंब केला तर नांदेड जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून घडू शकते. अकोल्यातील शेतकर्‍यांसारखी नांदेड जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर वेळ येवू नये. यासाठी वाढीव मोबदला देण्याच्या प्रक्रियेची कालनिश्चिती करुन त्यांचा निर्णय तातडीने घ्यावा, असेही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अशोकराव चव्हाण यांच्या समवेत जिल्हाधिकार्‍यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये माजी पालकमंत्री आमदार डी. पी.सावंत, आमदार वसंतराव चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, प्रवक्ते संतोष पांडागळे यांची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details