नांदेड- तामसा येथील श्री क्षेत्र बारा ज्योतिर्लिंग देवस्थानच्या वतीने मकरसंक्रातीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा भरते. यावेळी मंदिर समितीच्या वतीने भक्तांसाठी भाजी, भाकरी पंगतीची व्यवस्था करण्यात आली होती.
मराठवाड्यातील बारा ज्योतिर्लिंग देवस्थान यात्रा प्रसिध्द असून तामसा-भोकर रोडवर ही यात्रा भरते. मंदिर समितीचे पुजारी रेवणसिद्ध महदलिंग कंठाळे हे मंदिरात पूजा व देखभाल करत असतात. या ठिकाणी मकरसंक्रातीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करीदिनी ही यात्रा भरते. बारा ज्योतिर्लिंग असलेली महादेवाची पिंड असून पिंडीचा अभिषेक सकाळी 8.30 वाजता केला जातो. त्यानंतर भाजी-भाकरीचा नैवेद्य 12.30 वाजता दाखवून भक्तांना प्रसाद वाटप केला जातो. या भाजी-भाकरीचा स्वाद घेण्यासाठी नांदेड, हिंगोली, परभणी, पुणे, यवतमाळ, निजामाबाद, तेलंगणा राज्यातीलही भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. सुमारे 120 क्विंटलची भाजी केली जाते. तर 90 क्विंटल ज्वारीच्या भाकरी केल्या जातात. या भाजीमध्ये वान म्हणून बोरं, आवळा, ऊस, केळी, बिबे, जांब टाकले जातात. त्याचबरोबर विविध भाजीपालाही टाकला जातो. ही भाजी मोठ्या कढईत तयार केली जाते. भाजी तयार करण्यासाठी शेकडो महिला, पुरुष व बच्चे कंपनीही उत्साहाने मदत करतात. तामसा, जांभळा, पाथरड, तळेगांव, वायफणा, आष्टी, घोगरी, दत्त पिंपळगाव, उमरी आदीसह परिसरातील 45 गावांतील गावकरी भाकरी आणतात.