नांदेड- कंधार तालुक्यातील कुरळा ते महालिंगी हा अवघ्या 13 किलोमीटरचा पक्का रस्ता तयार करून देण्याच्या मागणीसाठी महालिंगी ग्रामस्थांनी शिवारातील भर रस्त्यावरील खचलेल्या ओढ्यात बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यानंतर आमदार तुषार राठोड यांनी रस्ता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. मात्र, आमदार खरोखरच रस्ता करून देतील का? याबाबत साशंकता असल्याने ग्रामस्थांचे केविलवाणे चेहरे केले होते.
कुरुळापासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर 1 हजार 800 लोकसंख्येचे महालिंगी गाव कंधार तालुक्याच्या शेवटच्या टोकावर अहमदपूर, जळकोटच्या सीमेवर आहे. गावात प्राथमिक शिक्षण उपलब्ध असले तरी माध्यमिक शिक्षणासाठी याच रस्त्याने पायपीट करत शेलदरामार्गे हडोळतीकडे जावे लागते. येथे 15 वर्षांपासून बस बंद आहे. पावसाळ्यात ओढ्याला पाणी आल्यास घरीच शाळा भरते. या ठिकाणी 25 वर्षांपूर्वी आईच्या हातून निसटून मुलगा वाहून गेला होता. त्यानंतर अनेक जनावरेही या रस्त्यावरून वाहून गेली आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी निवडणूक आली की बगळ्यासारखे गावात उतरतात. विकासाची स्वप्ने दाखवतात, लोकही त्याला भूलतात, मतदान करतात. निवडणुकीनंतर पुन्हा सुरू होतो जीवनाचा संघर्ष.