नांदेड - सिरंजनी रोडवर ३१ जानेवारीला रात्री साडे नऊच्या दरम्यान, काही अज्ञात दरोडेखोरांनी २ व्यापाऱयांकडील ९० हजारांचा मुद्देमाल लुटला. या व्यापाऱ्यांचे मे. शंकर ट्रेडींग कंपनी नावाचे उमर चौक येथे दुकान आहे. हे व्यापारी एकमेकांचे भाऊ असून आपले दुकान बंद करून घरी जात असताना ही घटना घडली. अविनाश शंकर संगनवार आणि अनिल शंकर संगनवार अशी लूटमार झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत.
हिमायतनगरमध्ये वाटमारी ; दोघांना लुटले, व्यापारी वर्गात धास्ती - सिरंजनी रोड
हिमायतनगरमध्ये वाटमारीची घटना घडली असून दोन व्यापाऱ्यांना लुटण्यात आले आहे. यामुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेहमी प्रमाणे रात्रीच्यावेळी दुकान बंद करून हे दोन भाऊ आपल्या दुचाकीने सिरंजनी गावाकडे जात होते. यावेळी काही अंतरावर त्यांच्या दुचाकी समोर अचानक एक कुत्रा आला. त्यामुळे त्यांनी आपली गाडी थांबवली. याच दरम्यान, त्यांच्यावर पाळत ठेवून असलेले ४ दरोडेखोरे तेथे आले आणि त्यांनी दोघा भावांना लोखंडी रॉड, लाकडी ओढक्याने मारहाण केली. मारहाणीनंतर दरोडेखोरांनी त्यांच्या पिशवीतील ९० हजारांची रोकड लंपास केली आणि तेथून ते पसार झाले.
या मारहाणीत अविनाशच्या डोक्याला गंभीर मार लागून १७ टाके पडेल आहेत. तर अनिलच्या हातापायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. सध्या अविनाशला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनिलवर ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत. या दरोड्यामुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.