नांदेड : नायगाव येथील मागासवर्गीय वस्तीगृहातील मुलांच्या जेवणामध्ये अळ्या निघाल्याचा (Larvae in the meal) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वारंवार देण्यात येणाऱ्या निकृष्ट जेवणाला कंटाळुन वसतिगृहातील मुलांनी तहसील कार्यालयाकडे धाव घेतली. परंतु तेथील अधिकाऱ्यांनी हा आमचा विभाग नाहीये संबंधित विभागाकडे जाऊन तक्रार करा, अस सांगितल्याने मुलं तिथून निघून गेली. हा सर्व प्रकार पाहता सामाजिक न्याय विभाग आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
निकृष्ठ दर्जाचे जेवण - मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या मुलांना शिक्षणाची चांगली सोय व्हावी यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत राज्यात मागासवर्गीय मुलांसाठी शासकीय वसतिगृहे १९९२ साली सुरू करण्यात आली. यात इतर सोयी सुविधा सह निवास व भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात येते. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुुक्यात याच विभागांतर्गत येणारं एक शासकीय वसतिगृह २०११-१२ साली सुरू करण्यात आले आहे. परंतू या वसतिगृहात अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची तक्रार येथील विद्यार्थ्यांनी केली आहे.