नांदेड : या प्रकरणी भंडारे यांच्या तक्रारीवरून अन्न आणि औषध प्रशासनाच्या निरीक्षकांनी चॉकलेटचा साठा जप्त करत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे. नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीच्या या चॉकलेटमध्ये अळ्या आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच चॉकलेटच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यासंबंधी सुभाष भंडारे यांनी नांदेड येथील अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त यांच्याकडे केली आहे. यात प्रयोगशाळेतील अहवालानंतर कार्यवाही करावी. तसेच मॉलच्या खाद्यपदार्थाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. चॉकलेट खाण्याविषयी शंका निर्माण होत आहेत.
चौकशीची मागणी :यासंबंधी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 16 फेब्रुवारी 2023 रोजी डी मार्ट व सरणी लातूर फाटा येथील मॉलमध्ये नेस्ले कंपनीचे किटकॅट चॉकलेट खरेदी केले. ते खाण्यासाठी फोडले असता, त्यामध्ये चॉकलेटच्या रंगाची जिवंत अळी आढळून आली आहे. ही बाब माॅल प्रशासनास तात्काळ कळवली. लेखी तक्रारीने किटकॅटच्या सर्व बॅचची प्रयोगशाळेतून चौकशी करावी. लहान मुलाच्या जीवनाशी खेळणाऱ्या कंपनीवर तात्काळ कार्यवाही करावी. या कंपनीच्या सर्व बॅचची चौकशी करावी, तसेच डी मार्टमधील सर्व हवाबंद खाद्यपदार्थांची चौकशी केली जावी. जेणेकरून लहान मुलाच्या जीवनाशी धोका निर्माण होणार नाही, असे सुभाष दिगंबर भंडारे यांनी म्हटले आहे.