महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये खरीप पिकांचे मोठे नुकसान; पीकविमा व अनुदानाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांसह बागायती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकऱ्यांचे शासनाच्या नुकसानभरपाई तसेच पीकविमा परताव्याच्या मंजूरीकडे लक्ष लागले आहे.

large-crop-damage-in-kharif-season-in-nanded
नांदेडमध्ये खरीपात पिकांचे मोठे नुकसान; पीकविमा व अनुदानाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

By

Published : Oct 27, 2020, 7:26 PM IST

नांदेड - जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात सरासरी १७० टक्के पावसाची नोंद झाली. तर ऑक्टोबरमध्येही तब्बल १३४ टक्के पाऊस झाल्यामुळे खरिपातील पिकांसह बागायती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकऱ्यांचे आता शासनाच्या नुकसानभरपाई तसेच पीकविमा परताव्याच्या मंजूरीकडे लक्ष लागले आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक सात लाख ७७ हजार ६२८ हेक्टर क्षेत्र खरिपात पिकाखाली येते. तर रब्बीमध्येही तब्बल तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. सात लाख ९५ हजार ८०० खातेदार शेतकऱ्यांची संख्या असलेल्या नांदेड जिल्ह्यात सतत नैसर्गिक संकट येत असल्याने शेतकरी अडचणीत येत आहेत. यंदा जूनमध्ये चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पेरणीला सुरवात केली. पेरणीनंतर पावसाने ओढ दिल्यामुळे पेरलेले सोयाबीन निघाले नाही. यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. यानंतर समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांची परिस्थिती चांगली होती. अशातच सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. या महिन्यात तब्बल २३ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. यात नांदेडमधील एक, बिलोली पाच, मुखेड सहा, कंधार दोन, हदगाव दोन, देगलूर चार, धर्माबाद एक व नायगाव दोन अशा मंडळाचा समावेश आहे. भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार सप्टेंबरमध्ये सरासरी १६७.४० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षीत आहे; परंतु प्रत्यक्षात मात्र १७० टक्क्यानुसार २८४.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याकाळात सोयाबीन, ज्वारी, कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर ऑक्टोबरमध्येही परतीच्या पावसाने जोरदार दणका दिला. या महिन्यात हदगाव तालुक्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली. ऑक्टोबरमध्ये सरासरी ५४.६० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो; परंतु या महिन्यातही १३४.८० टक्क्यानुसार ७३.६० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details