देगलूर/नांदेड : देगलूर तालुक्यातील येडूर येथील श्रीपतराव पाटील (90 ) व चंद्रकलाबाई (60) हे दोघे मागील काही वर्षांपासून देगलूर उदगीर या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या लाल बहाद्दूर शास्त्रीनगरमध्ये एकत्र राहत होते. तीन-चार वर्षांपूर्वी चंद्रकला बाईच्या संपत्तीवरून त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला होता, अशी परिसरात चर्चा असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांची तत्काळ कारवाई :पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व सहायक पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सोमवार दि. 23 जानेवारीच्या रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात तीन अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून एका चोराने श्रीपतराव पाटील यांच्या तोंडावर पाय देऊन त्यांचे हातपाय बांधून चाकूचा धाक देत उभा राहिला.
इतक्या किमतीची चोरी :बाकीच्या दोन चोरांनी चंद्रकलाबाई आरडा-ओरड करू नये म्हणून तिचे तोंड व पाय कापडाने बांधून लुटालूट करीत कपाटात ठेवलेले 5 तोळे सोन्याचे कडे, 70 तोळे चांदीचे वाळे काढून घेतले. चंद्रकलाबाईच्या अंगावरील एका तोळ्याचे सोन्याचे मनी, दीड तोळ्याची बोरमाळ, 5 तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या असे एकूण साडेबारा तोळे सोन्याचे दागिने व 70 तोळ्याचे वाळे असा 3 लाख 89 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.