नांदेड -कोरोना आणि लॉकडाऊनचे सलग दोन वर्षे संकट पचवून शेतकरी पुन्हा एकदा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. सर्वत्र कामे बंद असताना 'त्याला ना बंद, ना सुट्टी ना आराम' येणाऱ्या काळात जगाला जगविण्यासाठी अन्नधान्याचे उत्पन्न काढण्यासाठी तो कामात गुंतला आहे. मशागत शेतकऱ्यांच्या शिवारात सध्या भर उन्हात खरीपपूर्व हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. खरीप पेरणी साधारणतः आठ लाख हेक्टरवर होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
परिस्थितीशी दोन हात करत खरिपाच्या तयारीला
जगावर कुठलेही संकट येवो त्याचा पहिला मार शेतकऱ्यांच्या माथी असतो. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, कधी अवकाळीचे संकट हे नित्याचेच असते. यातून कसे-बसे उत्पन्न काढले तर योग्य दर मिळत नाही. आता कोरोनाचे संकट आल्यानंतर पहिला फटका हा शेतकऱ्यांनाच बसला आहे. दळण-वळण बंद झाल्यामुळे शेतमालाचे भाव प्रचंड खाली कोसळले. यातून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. जगातील कितीही संकटे शेतकऱ्यांवर कोसळली तरी मागे न हटता परिस्थितीशी तो दोन हात करतच असतो. यातच, रब्बी हंगाम संपतो ना संपतो शेतकरी उन्हा-तान्हात खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे.