नांदेड -नांदेडकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंधार तालुक्यातील कामेश्वर वाघमारे या मुलाची निवड प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी झाली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या कामेश्वरने नदीत वाहून जाणाऱ्या दोन मुलाना बाहेर काढलं होतं.
शौर्य पुरस्कारासाठी कमेश्वरची निवड-
प्रजासत्ताकदिनी दिल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री बाल पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण पाच मुलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या मुलाला त्याने दाखवलेल्या शौर्यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे.
चौदा वर्षीय धाडसी कामेश्वर-कंधार तालुक्यातील घोडज येथे कामेश्वर वाघमारे याचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण देखील घोडज इथंच पूर्ण झालं. पुढील शिक्षणासाठी तो महात्मा फुले माध्यमिक विद्यालय शेकापूर येथे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील हे मोल मजुरी करून आपला घरगाडा चालवतात. त्याला एकूण चार भावंड आहेत.
नदीत वाहून जाणाऱ्या दोघांचे वाचवले प्राण-२०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीत मनार नदीला मोठा पूर आला होता. या नदीत काही मुलं खेळण्यासाठी गेले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेजण वाहून जाऊ लागले. नदी बाजूला असलेल्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या कामेश्वरने तात्काळ प्रसंगावधान दाखवून वाहून जाणाऱ्या गजानन श्रीमंगले आणि आतित्य धुंडे यांना बाहेर काढलं. मात्र कमेश्वरला तिसऱ्या मुलाला वाचवण्यात अपयश आलं. त्यात ओम मठपती याचा मृत्यू झाला.
आमदार शिंदे यांनी केला पाठपुरावा-आपला जीव धोक्यात टाकून एखाद्याचा जीव वाचवण्याचं धाडस कामेश्वर या चौदा वर्षीय बालकाने केलं आहे, अशा शब्दात आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी कामेश्वरचं कौतुक केलं आहे. शिंदे यांच्या नांदेड येथील निवासस्थानी सहकुटुंब सत्कार करण्यात आला. कामेश्वरला शौर्य पुरस्कार मिळवून देण्यासाठी आमदार शिंदे यांनी मोलाची भूमिका बजावली. प्रशासन स्तरावर येणाऱ्या अडचणीत त्यांनी वयक्तिक लक्ष घातले. वेळोवेळी राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा केला, त्यामुळे अत्यंत गरिबीची परिस्थिती असलेल्या कामेश्वरला इथपर्यंत पोहचता आलं आहे.
राष्ट्रीय शौर्य पुरस्काराचे स्वरुप-राष्ट्रीय शौर्य पुरस्कार हा भारतातील १६ वर्षाखालील शूर बालकांना दिला जातो. कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या बालकांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. पदक, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असते.