नांदेड: शहरात गेल्या नऊ दिवसांपासून वारीस दे पंजाब या खलिस्तान समर्थक संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग हा फरार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत. सात राज्यांतील पोलीसांसह राष्ट्रीय तपास यंत्रणाही त्याच्या मागावर आहे. नांदेडातही अमृतपाल सिंगचे समर्थक आहेत. त्यामुळे नांदेड पोलिस अलर्टवर होते. तसेच शनिवारी रात्री पोलीसांनी शहरातील काही भागात अचानकपणे कोम्बिंग ऑपरेशन राबवून घरांची झाडाझडती घेतली. याप्रंसगी अमृतपालच्या वारीस दे पंजाब या संघटनेच्या सदस्यांची कसून चौकशी करण्यात आली.
शहरात कोम्बिंग ऑपरेशन: वारीस दे पंजाब या संघटनेकडून देशविघातक कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून पंजाब पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून या संघटनेच्या सदस्यांची धरपकड करण्यात येत आहे. संघटनेने एकेएफ नावाचे सैन्य, स्वतःचे चलन आणि खलिस्तानचा वेगळा नकाशाही तयार केल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे देशभरातील तपास यंत्रणा अलर्ट आहेत. तसेच पंजाबमध्ये गुन्हा केल्यानंतर अनेक गुन्हेगार हे आश्रयासाठी येतात. त्यामुळे नांदेड पोलीसही बाहेरून येणाऱ्या प्रत्येकावरलक्ष ठेवून आहे. नांदेडात वारीस दे पंजाब या संघटनेचे अनेक सदस्य आहेत. त्यात अमृतपाल अद्याप सापडला नसल्याने सर्वांचेच टेन्शन वाढले आहे. तो नांदेडात येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती. याकारणामुळे पोलीसांनी शनिवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन शहरातील काही भागात राबविले आहे.