नांदेड - दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त आणि शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी पुढाकार घेतला आहे. 'जन आशीर्वाद' यात्रेनिमित्त उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले युवासेनाप्रमुख नांदेड जिल्ह्यात आले असता त्यांनी पिंपळगाव (निमजी) येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधून पर्यावरणाचे महत्व पटवून दिले. तसेच प्लास्टिक आणि प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी संदेश दिला.
जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्यात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. देगलूर, बिलोलीनंतर नांदेड दक्षिण भागातील मोहनपुरा येथील महत्वाच्या आणि ८० कोटी रु. खर्चून बांधण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी त्यांनी पिंपळगाव (निमजी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रदूषण, प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र करण्याबाबत संदेश दिला. तसेच कापडी पिशव्यांचे वाटप करून सर्वाना प्लास्टिक मुक्तीसाठी प्रोत्साहीत करावे, असेही सांगितले. प्रदूषण आणि प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र ही काळाची गरज आहे. असेही ते म्हणाले.