महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या मतदारसंघातच रस्त्याची दुरवस्था, कामे पूर्ण न करताच उचलली जातात बिले - Corruption in road works nanded

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातच रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. एक प्रकारे माणूस चंद्रावर तरी गाडी चालवू शकतो, पण ग्रामीण भागातील रस्त्यावर गाडी चालवणे म्हणजे तारेवरची कसरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

increase accidents Due to Bad roads in nanded
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या मतदार संघातच रस्त्यांची दुरवस्था

By

Published : Nov 17, 2020, 9:13 PM IST

नांदेड - राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातच रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. एक प्रकारे माणूस चंद्रावर तरी गाडी चालवू शकतो, पण ग्रामीण भागातील रस्त्यावर गाडी चालवणे म्हणजे तारेवरची कसरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेलगाव (ता.अर्धापूर) येथील नागरिक व्यक्त करत आहे. विशेष म्हणजे कामाला नेमकीच सुरुवात झाली असताना काम पूर्ण झाल्याचा फलक या ठिकाणी लावून बिलेही उचलण्यात आली आहेत. यासंदर्भात ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी नागोराव भांगे यांनी घेतलेला हा आढावा

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या मतदार संघातच रस्त्यांची दुरवस्था

काम पूर्ण न होताच लावला काम पूर्ण झाल्याचा फलक आणि बिलाची रक्कमही घेतली

नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गापासून दाभड ते शेलगांव या २.९४ किमी रस्त्यासाठी मागील वर्षी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून १ कोटी ५ लाख ९५ हजारांचा निधी मंजूर झाला होता. कंत्राटदाराकडून रस्त्यावर लावलेल्या बोर्डानुसार, ११ सप्टेंबर २०२० रोजी रस्त्याचे काम पूर्ण झाले आणि १२ सप्टेंबर २०२० पासून रस्त्याचा पाच वर्षांचा देखभाल कालावधी सुरू झाला आहे. त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतुदही करण्यात आली आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराला खडीकरणाचेही काम पूर्ण झालेले नसताना, बिल दिल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे. केवळ गिट्टी आणि मुरुम पसरवून रस्ता पूर्ण करता येतो का ? असा सवाल येथील नागरीकांनी उपस्थित केला आहे.

रस्त्यावर अनेकदा अपघाताच्या घटना

पावसाळ्यापूर्वी गिट्टी पसरवून त्यावर थातूरमातूर मुरूम टाकून वेळ मारून नेली. पावसाळ्यात संपूर्ण मुरूम रस्त्यावरून वाहून गेला आहे. सध्या दुचाकी चालकांना गिट्टी उघड्या पडलेल्या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. दिवाळीमुळे या रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वीच या रस्त्यावर एक अपघात झाल होता. दिवाळीसाठी बहिनीला घरी घेऊन येत असतांना या व्यक्तीचा अपघात झाला. या अपघातात भऊ आणि बहीन दोघेही जखमी झाल्याने ऐन दिवाळीत त्यांना रुग्णालयात जाण्याची वेळ आली.

चार महिन्यातच गिट्टी पडली उघडी

दाभड ते शेलगाव रस्त्यावर गिट्टीसोबत साधा मुरूमही टाकण्याची तसदी संबंधित गुत्तेदाराने घेतली नाही. पावसाळ्यापूर्वी मातीसोबतच गिट्टी टाकून वेळ मारून नेली. अवघ्या चार महिन्यातच गिट्टी उघडी पडली आहे. तसेच अनेक ठिकाणी अजूनही गिट्टीचे ढीग तसेच आहेत. आता या रस्त्यावर ऊस वाहतुकीचे ट्रक धावत असल्याने हा रस्ता अजून खराब झाल आहे.

रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष

प्रशासनाला अथवा गुत्तेदाराला जाब विचारण्यासाठी लोकप्रतिनिधी देखील पुढे येत नाहीत. मांजराच्या गळयात घंटा बांधायची कोणी ? अशी परिस्थिती आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या अशोक चव्हाण यांच्याच मतदार संघात रस्त्याची अत्यंत दुरवस्था आहे. जिल्ह्यातील इतर रस्त्यांची देखील अशीच अवस्था आहे. केवळ थातुरमातुर किंवा काम न करताच बिले उचलायची अशी चर्चा दबक्या आवाजात ऐकायला मिळते. आम्ही खालपासून ते वरपर्यंत कमिशन देतो. आम्हाला काय कुणाची भीती? असे अनेक गुत्तेदार उघडपणे बोलतात. जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील चित्र म्हणजे ' आवो चोरो बांधो भारा- आधा तुम्हारा आधा हमारा' अशी आहे. कनिष्ठापासून ते वरिष्ठांपर्यंत कोणी देखील तक्रारीची नोंद घेत नाही. असा आरोप ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे.

खडीकरणाची बिले दिली

सदरील कामाच्या संदर्भात संबंधित विभागाशी संपर्क केला असता. मी तुम्हाला समोरासमोर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. जे काय बोलायाचे ते फोन वरच बोला अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अनियंता सुधीर पाटील यांनी दिली. त्यांनी याबाबत अधिक बोलणे टाळले. तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर रितसर अर्ज करा, असेही म्हणाले. एवढेच नाही तर या रस्त्याच्या खडी करणाचे काम झाले असून, बिले कंत्राटदाराला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र कंत्राटदाराने रस्ताच तयार केला नसल्याचे नागिरिकांचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details