महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात खळबळ! सख्ख्या भावानेच भावाचा खून केल्याच्या तीन घटना

नांदेड जिल्ह्यात सख्ख्या भावानेच सख्ख्या भावाचा खून केल्याचा तीन घटना घडल्या आहेत. अगदी शुल्लक कारणावरून या हत्या झाल्या आहेत. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

माहूर येथील घटनेतील व्यक्ती
माहूर येथील घटनेतील व्यक्ती

By

Published : Jul 7, 2021, 10:35 PM IST

नांदेड - जिल्ह्यात तीन तालुक्यात सख्ख्या भावानेच सख्ख्या भावाचा खून केल्याच्या घटना घडल्या आहेत. पिंपळगाव महादेव (ता. अर्धापूर) येथे भावाने जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून आपल्या सख्या भावावर चाकुने वार करुन निर्घृण हत्या केली. तर, दुसरी घटना माहूर तालुक्यातील दत्तमांजरी येथे मटण वाढण्याच्या क्षुल्लक कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाचा खून केला. तर, तिसरी घटना मुखेड तालुक्यातील बेरळी येथे शेतात जाण्याच्या रस्त्यावरून लहान भावाने मोठ्या भावाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे.

जुन्या भांडणाच्या रागातून भावानेच केला भावाचा खून

अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील दिगांबर अमृतराव कल्याणकर (वय ४८) यांनी मागील भांडणाच्या कारणावरुन मनात राग ठेवून गावातील सार्वजनिक रस्त्यावर आपला भाऊ अनिल अमृतराव कल्याणकर (वय४५) याला थांबवले. मागच्या भांडणावरुन शिवीगाळ सुरु केली. एवढेच नाही तर त्याच्या पोटावर, छातीवर चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात भाऊ पडला असनाही तो त्याला मारहाण करतच होता. या मारहाणीत अनिल कल्याणकर हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच अर्धापूर पोलिसांनी रात्री घटनास्थळी भट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मारेकरी दिगांबर कल्याणकर याला ताब्यात घेतले. या प्रकरणी अमोल अनिल कल्याणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दिगांबर अमृतराव कल्याणकर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मटण वाढण्याच्या कारणावरून लहान भावाचा घेतला बळी

माहूर शहराच्या दक्षिणेस सुमारे 9 किमी अंतरावर असलेल्या दत्तमांजरी या खेड्यात राहाणाऱ्या बाबुलाल जाधव या शेतकऱ्यांच्या कुटूंबात मंगळवार हा दिवस काळ ठरला. जेवणात मटण वाढण्याच्या क्षुल्लक कारणावरून त्यांच्या दोघा मुलात कडाक्याचे भांडण झाले. मोठा भाऊ रामेश्वर बाबुलाल जाधव (वय 27 वर्षे) याने ज्ञानेश्वर बाबुलाल जाधव (वय 25 वर्षे) याच्या पोटावर सूरीने सपासप वार करून सूरा आईच्या दिशेने भिरकावला. त्यात ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यु झाला. ज्ञानेश्वर जाधव याला माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता, डॉक्टर विजय मोरे यांनी त्यांस मृत घोषीत केले. रामेश्वर जाधव याला माहूर पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रत्यक्षदर्शी अजय उत्तम राठोड (वय 30)यांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे हे करीत आहेत.

मुखेड तालुक्यात लहान भावाकडून मोठ्याचा खून

मुखेड तालुक्यातील बेरळी (ब) शिवारात शेतात येण्या-जाण्याच्या रस्त्याच्या कारणावरुन लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना घडली. ही घटना 6 जुलै रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली. जयवंतराव गोविंदराव जुने (50) असे मृताचे नाव आहे. त्यांचे मारेकरी दिलीप गोविंदराव जुने हे त्यांचे बंधू असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details