नांदेड - कोरोनाशी दोन हात करताना नांदेड जिल्ह्याने एका विशिष्ट कालावधीत देशात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या रूग्णसंख्येचा आकडा दिला आहे. हा आकडा कोणत्याही खासगी संस्थेने जाहीर केलेला नसून सरकारच्याच संस्थेने जारी केला आहे. देशातील ७० जिल्ह्यांमध्ये नांदेड जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांमध्ये सर्वाधिक वेगाने संसर्ग पसरल्याचे या अहवालात म्हटले आहे.
नांदेड जिल्ह्यात 385 टक्क्यांनी वाढला कोरोना-
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने १ ते १५ मार्च दरम्यान देशातील ७० निवडक जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णसंख्येच्या बदलेल्या स्थितीचा आढावा घेतला. देशातील ७० जिल्हे पूर्वीच्या तुलनेत अधिक वेगाने कोरोना संख्या वाढलेले क्षेत्र होते. महाराष्ट्रातील नांदेड, नंदुरबार, बीड, पुणे, नाशिक, जळगाव, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, अहमदनगर, बुलडाणा, औरंगाबाद व अकोला या १३ जिल्ह्यांचा यात समावेश होता. सरकारी संस्थेने केलेल्या पाहणीत नांदेड जिल्ह्यात आधीच्या १५ दिवसाच्या तुलनेत नंतरच्या पंधरा दिवसात तब्बल ३८५ टक्क्यांनी रुग्ण संख्या वाढल्याचे या अहवालात म्हटले आहे.
गुरुवारी 625 कोरोना बाधित-
नांदेड जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 211 अहवालापैकी 625 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 361 तर अँटिजेन तपासणीद्वारे 264 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आता जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 29 हजार 145 एवढी झाली आहे.
तीन जणांचा मृत्यू-
बुधवार 17 मार्च 2021 रोजी तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची संख्या 627 एवढी झाली आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती-
एकूण घेतलेले स्वॅब- 2 लाख 59 हजार 04
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 25 हजार 20
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 29 हजार 145
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 24 हजार 565
एकूण मृत्यू संख्या-627