नांदेड : शेलगाव येथील स्मशानभूमी पूर्णतः पुराच्या पाण्याखाली ( Crematorium at Shelgaon Submerged ) गेल्यामुळे बुधवारी झालेल्या अंत्यसंस्कार कार्यक्रमासाठी सर्वांना गुडघ्यापर्यंत पाण्यातून जावे लागले. तर शेवटी हा अंत्यसंस्कार कार्यक्रम रस्त्यावरच उरकावा लागला. हे विदारक चित्र आजच्या आधुनिक युगातील प्रगतीच्या वाटेवर असलेल्या भोकर विधान सभा मतदारसंघातील शेलगाव येथील ( Shelgaon in Bhokar Assembly Constituency ) आहे.
अर्धापूर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस : अर्धापूर तालुक्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने शेलगाव येथून जाणाऱ्या मेंढला नाला नदीला मोठा पूर आला. या पुराने संपूर्ण गावाला वेढा दिल्यामुळे मंगळवार, बुधवार या दोन दिवसांत शेलगावचा संपर्क तुटला ( Cut Off Village Communication From Main Road ) होता. पुरामुळे मुख्य रस्त्याशीदेखील गावाचा संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत येथील कमलाबाई मारोतराव राजेगोरे यांचा दि. १३ जुलै बुधवारी दीर्घ आजाराने मृत्यू झाला.
गावातील स्मशानभूमी गेली पाण्याखाली : दरम्यान, येथील स्मशानभूमी मेंढलानाला नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेली होती. अशावेळी स्वर्गीय कमलाबाई राजेगोरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कसे आणि कुठे करायचे? हा यक्ष प्रश्न गांवक-यांसमोर होता. शेवटी सर्वानुमते हा अंत्यसंस्कार कमलाबाई राजेगोरे यांच्या शेतात करण्याचे निश्चित झाले. परंतु, त्यांची शेतीसुद्धा नदीकाठीच असल्यामुळे नदीपात्रातील गुडघ्यापर्यंत पाणी साचलेल्या रस्त्याने वाट शोधत जाऊन एका कोपऱ्यात रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.