नांदेड: माळरानावर तेही अत्यल्प पाणी उपलब्ध असताना जोडप्याने मेहनत घेऊन ही चिकूची बाग फुलवली आहे. त्यासोबतच शेतात घरात लागणारे अन्य भाजीपालाही ते पिकवतात. लागवडीनंतर चौथ्या वर्षांपासून चिकुचे उत्पादन होण्यास सुरुवात झाली. उत्पन्नातून जोडप्यांचा खर्च भागत असल्याचे अभिमानाने या शेतकऱ्यांनी सांगितले. एकीकडे नापिकी आली म्हणून कोवळ्या वयात आत्महत्या करणारे शेतकरी पाहिले की, अश्या वृद्ध शेतकऱ्यांना पाहून आश्चर्यचकित व्हायची वेळ येते.
कंपनी सोडून केली शेती:अल्पभूधारक शेतकरी शंकरराव काशीराम पाकलवाड हे तुप्पा येथील रहिवासी आहेत. त्यांची जवाहरनगर परिसरात तीन एकर शेती आहे. त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत. लग्नानंतर त्यांनी सिडको येथील टेस्कॉम कंपनीत तीस वर्षे नोकरी केली व मुलांचे शिक्षण पूर्ण केले. आज त्यांची दोन्ही मुले जिल्हा परिषद शाळांत शिक्षक आहेत. मुलींचे सुशिक्षित घराण्यातील मुलांसोबत लग्न झाले आहे. मुले नोकरीला लागल्यानंतर त्यांनी कंपनी सोडली व गावाकडे राहू लागले. तीन एकर कोरडवाहू शेतीतून उत्पन्न कमी मिळत असल्यामुळे त्यांनी बागायती शेती करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी आपल्या शेतात पाच बोअरवेल घेतले. त्यापैकी फक्त एका बोअरवेलला दोन इंची पाणी लागले. एवढ्या कमी पाण्यावर शेती करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी चिकूची लागवड करण्याचे ठरविले.