नांदेड - वाळू घाटांचे सर्वेक्षण, त्यानंतर यावर नागरिकांकडून मागविण्यात आलेले अभिप्राय व त्यापुढे आता पर्यावरण विभागाची मान्यता यामुळे वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया लांबत चालली आहे. ही बाब वाळू माफियांसाठी पर्वणीच ठरली आहे. लिलावात भाग घेण्याऐवजी प्रशासनातील काहींना हाताशी धरुन वाळू चोरटे अनेक भागात सक्रिय असून लिलावापूर्वीच वाळू काढून आपला 'कोटा' पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लिलावा अभावी वाळू चोरट्यांची लॉटरी लागली असताना अनेक कारवाया करूनही प्रशासन हे त्यांच्यासमोर हतबल असल्याचे दिसते.
टाळेबंदीमध्ये अत्यावश्यक वस्तुंच्या वाहतुकीस परवानगी असताना राजरोसपणे गौणखनिजांची वाहतूक होत आहे. नुकतेच जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या पाच ट्रक पकडले आहेत.
माती भरलेल्या पाच, एक ट्रक वाळू भरलेली आणि अन्य एका वाहनास त्यांनी पकडले आहे. काही दिवसांपूर्वीच अवैध वाळू उपसा करणारे तराफे आणि बोटी उडविल्यानंतरही वाळू चोरटे थांबले नाहीत. वाळू उपशासाठी त्यांनी नविन तराफे आणि बोटी सक्रीय करुन ठेवल्या आहेत. लांबलेल्या प्रक्रियेमुळे वाळूघाटांच्या लिलावात भाग घेण्याऐवजी मिळेल तेथून गौणखनिजांची चोरी करण्याची शर्यत जिल्ह्यात सुरु झाली आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडून नुकसान होत असले आहे.