नांदेड- अर्धापूर तालुक्यातील भोकरफाटा परिसरासह अनेक ठिकाणांवर अवैध दारुच्या धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. तसेच मटका व्यवसायही चांगलेच डोके वर काढू लागला आहे. त्यामुळे पोलीस फक्त बघ्याचीच भूमिका बजावत असल्याचा आरोप होत आहे. केवळ तात्पुरती कार्यवाही करायची पुन्हा अवैध धंदे सुरू करण्यासाठी पाठबळ द्यायचे अशाप्रकारचे वर्तन पोलिसांकडून होत असल्याचे चित्र आहे.
अर्धापूर तालुक्यात पोलिसांच्या 'अर्थपूर्ण' दुर्लक्षामुळे अवैध व्यवसायिकांना 'अच्छे दिन' आल्याचे चित्र आहे. राजरोसपणे अवैध दारू विक्री, मटका, जुगार अड्ड्याचे व्यवसाय सुरू आहेत. हे सर्व प्रकार माहीत असूनही पोलीस प्रशासनाकडून निव्वळ बघ्यांची भूमिका घेतली जात आहे.
तालुक्यातील विविध गावांत अवैध देशी दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. सहजरीत्या मोक्याच्या ठिकाणावर, खेडेगावात देशी दारू उपलब्ध होते. शिवाय काही गावांमध्ये दारू साठा जमा करत त्याची विक्री होते. देशी दारूच्या अवैध प्रकारामुळे मद्यप्राशन करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पोलीस प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नागरीकांतून होऊ लागला आहे. भोकरफाटा परिसरात दारू बंदी असताना या परिसरासह तालुक्यात खुलेआम विक्री होत असल्याची चर्चा आहे.
राज्यात दारू व गुटखा बंदी असली तरी तालुक्यात मात्र कागदोपत्री बंदी असल्याचे चित्र आहे. या अवैध प्रकारावर अंकुश बसविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांना एक प्रकारे अभय मिळत आहे. पोलिसांनी गुटखा पकडला तर पुढील कार्यवाही अन्न व भेसळ विभागाकडून केली जाते. त्यामुळे हा विषय आमच्या अखत्यारित नसल्याचे पोलिसांकडून बोलले जाते. सबंधित विभागाला या गैरप्रकाराची तिळमात्र चिंता होत नाही. परिणामी शाळा परिसरातील छोट्या टपर्यावरही गुटखा विक्री होते. कमी वयातील मुले गुटखा व्यसनाच्या आहारी जात असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
भोकरफाटा दाभडसह अर्धापूर तालुक्यात या व्यवसायात दिवसभरात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. खुलेआम चालणार्या अवैध व्यवसायाला पोलिसांचा 'ग्रीन सिग्नल' असल्यामुळेच ठोस कार्यवाही होत नाही, असा आरोप आता जनतेतून होऊ लागला आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकारी दौरा व पथक येण्याची तात्काळ खबर पोलिसांकडून अवैध व्यावसायिकाला देऊन सर्तक केले जात असल्याची जोरदार चर्चाही कानी येत आहे. यामुळे अवैध व्यवसाय एक प्रकारे सुरक्षित चालतो. स्थानिक पोलिस प्रशासन व वरिष्ठ पोलिस अधिकार्यांकडून अवैध व्यवसायाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्षाची भूमिका घेतली जाते. तालुक्यात अवैध धंदे राजरोसपणे चालू असलेल्या प्रकारावर अंकुश बसणार की नाही हा प्रश्न अनुत्तरीत आहे.