नांदेड - अर्धापूर तालुक्यातील सावरगाव येथील गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा प्रचारक गजानन आबादार या कार्यकर्त्याने हनुमान मंदिरासमोर शुक्रवार (दि. 11 फेब्रुवारी) सकाळपासून हे उपोषण सुरू केले होते. किराणा दुकान व सुपर मार्केटमधून वाईन विक्रीचा निर्णय सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी या उपोषणकर्त्यांची होती. वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात सुरू केलेले उपोषण सावरगांवच्या कार्यकर्त्यांनी मागे घेतले आहे. अर्धापूरच्या तहसीलदारांनी उपोषण ( Hunger Strike ) मागे घेण्याची विनंती केल्यानंतर कालपासून सुरू असलेले उपोषण थांबवण्यात आले आहे. आज (शनिवार) महसूल प्रशासनाने उपोषणकर्त्यांची भेट घेऊन तुमच्या मागणीबाबत वरिष्ठांना कळवल्याचे सांगितल्याने आता हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.
...मग गांजा उत्पादनास परवानगी द्या -सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न तसेच सरकारचे महसूल वाढावे यासाठी सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतल्याचे अनेकांनी सांगितले. पण, शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार निर्णय घेत असेल तर शेतकऱ्यांना गांजा उत्पादनासाठी परवानगी द्यावी. शेतकरी गांजाचे उत्पादन करुन ते कोणत्याही कंपनी किंवा भांडवलदारांना न विकता थेट ग्राहकांना विकतील, अशी मागणी गजानन आबादार यांनी केली.