नांदेड - जिल्ह्यातील कोविड-नॉन कोविड रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या 16 ते 64 स्लाईस क्षमतेच्या मशिन्ससाठी एचआरसीटी चाचणीचे दर सरकारने निश्चित केले आहेत. याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
कोविड / नॉन कोविड रुग्णांसाठी सीटी स्कॅन सारख्या तपासण्यांची आवश्यकता भासत आहेत. तपासणीसाठी खासगी रुग्णालये किंवा सीटी स्कॅन तपासणी सुविधा उपलब्ध असलेल्या तपासणी केंद्राकडून अवाजवी रक्कम आकारण्याबाबतच्या तक्रारी जनतेकडून, लोकप्रतिनिधींकडून सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये नमुद तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
नांदेडात कोविड-नॉन कोविड रुग्णांसाठी एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित.....! - नांदेड एचआरसीटी दर निश्चित बातमी
मशीनच्या क्षमतेनुसार एचआरसीटी चाचणी तपासणीसाठी कमाल दर मर्यादा पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे. यात 1 ते 16 स्लाईस सीटीसाठी 2 हजार रुपये, मल्टी डिटेक्टर सीटी मशीनच्या 16 ते 64 स्लाईससाठी 2 हजार 500 रुपये तर 64 स्लाईसपेक्षा अधिक मल्टी डिटेक्टर सीटी मशीनसाठी 3 हजार रुपये दर निश्चित केला आहे. या कमाल रकमेत सी.टी.स्कॅन तपासणी, तपासणी अहवाल सी.टी.फिल्म, पी.पी.ई किट, डिसइन्फेक्टंट, सॅनिटायझेशन चार्जेस व जीएसटी या सर्वांचा समावेश आहे.
एचआरसीटी –चेस्ट तपासणीसाठी निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यासाठी राज्यस्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य आरोग्य हमी सोसायटी व जिल्हास्तरावर (महानगरपालिका क्षेत्र वगळून) संबंधित जिल्हाधिकारी व संबंधित महानगरपालिका क्षेत्रात संबंधित महानगरपालिका आयुक्त नमूद केलेल्या कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यास सक्षम प्राधिकारी राहतील. हे दर आकारणी साथरोग कायद्याची अंमलबजावणी असेपर्यंत चालू राहतील, असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी परीपत्रकान्वये कळविले आहे.