नांदेड- येथील देगलूर शिवबानगर भागातील डॉ. विनायक मुंडे यांच्या घरी राहणाऱ्या मोलकरणीने त्यांच्या आईचा गळा दाबून दमदाटी करत सोन्याची लूट केली आहे. यात साडेसहा तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली.
हेही वाचा-'हे सरकार खोटारड्यांचं; तोंड उघडलं की खोटं बोलतात'; अनुराग कश्यप यांची रोखठोक प्रतिक्रिया!
देगलूर शहरातील शिवबानगर भागात डॉ. विनायक मुंडे यांचा दवाखाना व निवासस्थान आहे. सकाळी डॉ. मुंडे व त्यांच्या पत्नी डॉ. मुक्ता मुंडे दोघे शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात गेले होते. याच संधीचा फायदा घेत मोलकरीण शेख रिहाना ऊर्फ शीतल सतीश इंगळे हिने डॉ. मुंडे यांच्या आईला (ठकूबाई मुंडे) तुम्हाला आंघोळ घालते म्हणून स्नानगृहात नेले. तिने त्यांचा गळा दाबून दमदाटी करत गळ्यातील साडेतीन तोळ्याचे गंठण, अडीच तोळयाचे लॉकेट, गळ्यातील सात ग्रॅमच्या मण्यासह एकूण साडेसहा तोळ्याचे दागिने पळवले. याची किंमत १ लाख ३५ हजार रुपये आहे.
या मोलकरणीला पाच दिवसांपूर्वीच मुंडे यांनी कामावर ठेवले होते. (तिचे नाव रिहाना शेख असून तिने लग्नानंतर शीतल सतीश इंगळे असा नावात बदल केला होता.) दरम्यान, चोरी करण्यापूर्वी तिचा नवरा तेथून गेला होता. तिची रहाण्याची व्यवस्था मुंडे यांनी त्यांच्या घरी केली होती. डॉ. विनायक मुंडे यांच्या तक्रारीवरुन देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संगम परगेवार हे करीत आहेत. आरोपी महिलेच्या अटकेसाठी देगलूर पोलिसांची एक पथक हैदराबाद येथे रवाना झाले आहे.