नांदेड - जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खरिप हंगामातील सर्वच पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यांना आता तातडीची अर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. खरीप पिकासोबतच केळी, ऊस, हळद बागायती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांनाही शासनाकडून मदत मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही व आमचा पक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, त्यांना मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र, यासाठी राज्यातील तीन पक्षाचे आघाडी सरकार फक्त पोकळ घोषणा करत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथे नुकसान पाहणीसाठ आले असता ते शेतकऱ्यांशी बोलत होते.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यातील शेलगाव येथील पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. त्यानंतर तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला हातातोंडाशी आलेले संपूर्ण पिके उध्दवस्त झाली
मागील आठवड्यात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेले संपूर्ण पिके उध्दवस्त झाली. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (दि. २ ऑक्टोब)रोजी सायंकाळी मराठवाडा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी अर्धापूर तालुक्यातील शेलगाव, पिंपळगाव, नांदला - दिग्रस येथील पिकाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. .यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, राज्यातील आघाडी सरकारला शेतकऱ्यांना भेटण्यासाठी वेळ नाही. मात्र आम्ही शेतकऱ्यांचे दुःख आणि त्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी आपल्या बांधावर आलो आहोत. आणि भविष्यात सुध्दा शेतकऱ्यांच्या सुख - दुःखात सहभागी होण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
शेतकऱ्यांनी यावेळी फडणवीस यांना वारंवार होणाऱ्या अतिवृष्टीमुळे आता काहीच शिल्लक राहिले नसून, पिके नासून गेल्याच्या व्यथा सांगितली. तसेच, खरीप पिकासह बागायती पिकांचे मोठे नुकसान झाल्याचेही यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. विमा कंपनी तक्रारीसाठी कुठलाच प्रतिसाद देत नाही, तर शासनाकडून मदत मिळण्याच्या बाबतीतही शंका वाटते अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त करून आपण तरी आमचे दुःख समजून घ्यावी, अशी अपेक्षा फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली. केंद्र व राज्य शासनाकडून तातडीची मदत करावी आणि विमा मंजूर करावा अशी मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.
कर्जमाफी करण्यासाठी भाजपच्या वतीने निवेदन
यावेळी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, केळी उत्पादक शेतकऱ्यांना अर्थिक मदत द्यावी, महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी द्यावी. अशा मण्यांचे निवेदन फडणवीस यांना यावेळी देण्यात आले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते धर्मराज देशमुख, भाजयुमोर्चा जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख, तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, सरचिटणीस अवधुतराव पाटील कदम, हनुमंत पाटील राजेगोरे आदी शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले. तर, अनेक शेतकऱ्यांनी येथील प्रशासनाकडून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा पाडाच विरोधी पक्षनेते यांच्या समोर वाचला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून नुकसान झालेल्या पिकांचे पार्सल भेट
शेलगाव येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री आम्हा नुकसानग्रस्त शेतकर्यांना भेटीसाठी आलेले नाहीत. यावेळी, सोयाबीन, हळद, ऊस, कापसाची बोंडे, पिकलेली केळी, आदी पिकाचे शिलबंद पेटी फडणवीस यांच्याकडे दिली. ती पेटी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना द्या. किमान आमचे खरे हाल तरी त्यांच्यापर्यंत पोहोचवा. अशी विनंती शेतकऱ्यांनी यावेळी फडणवीस यांना केली आहे.