शिरड गावातील रमजानची अनोखी परंपरा नांदेड : नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील शिरड गावात हिंदु-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या फकीर बाबाची बाराशे वर्षा पूर्वीची दर्गा आहे. फकीर बाबा नवसाला पावणारा म्हणुन पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. ईथे नवस केल्याने बाळ होते, अशी श्रद्धा आहे. फकीर बाबाच्या नवसाने मुल झाल्यास त्याचे नाव देखील फकीर बाबा ठेवले जाते. नंतर बारसे करतांना नाव बदलतात. याच फकीर बाबांवरील श्रद्धा म्हणून रमजानमध्ये हिंदु महीला रोजा धरतात. कोणी तीन, पाच तर अनेक महिला महिनाभर उपवास धरतात. अजुनही या गावात ही परंपरा जपली जाते.
हिंदू बांधवसुद्धा रमजानमध्ये सहभागी : मुस्लीम बांधवांचा पवित्र असा रमजान महिना सुरू आहे. या पवित्र महिन्यात मुस्लीम बांधव सतत महिनाभर रोजा धरतात. परंतु हदगाव तालुक्यातील शिरड येथील हिंदू बांधवसुद्धा रमजान महिन्यात कुणी पाच, कुणी अकरा तर कुणी सतत महिनाभर रोजा ठेवतात. यामुळे शिरड गावात एकोपा आहे. हिंदू-मुस्लीम भाई-भाई या नात्याप्रमाणे राहतात. मुस्लीमसुद्धा हिंदूंच्या सर्वच सण- उत्सवात तन, मन, धनाने सहभाग घेतात. हदगाव तालुक्यातील शिरड येथे मुस्लिमांचे एका माळाच्या टेकडीवर पुरातन ताजमहालसारख्या प्रतिकृतीचे फकीर बुवाचे मंदिर आहे.
फकीर बाबाची दर्गा : दर गुरुवारी या मंदिरात गावातील सर्वच धर्मीयांचे लोक दर्शनाकरिता जातात. हा देव नवसाला पावतो, यामुळे पंचक्रोशीतील भाविक दर गुरुवारी दर्शनाला येऊन नवस बोलतात. शिरड येथील सर्व ग्रामस्थ या देवाला मानतात. गावात मुस्लिमांची २५ घरांची लोकवस्ती आहे. किमान १०० लोकसंख्या आहे. दरवर्षी हिंदू व मुस्लीम बांधवांकडून ईद उत्साहात साजरी केली जाते. यंदाही पवित्र रमजान महिन्यात मुस्लिमांसोबत हिंदू बांधवांनी मोठ्या श्रद्धेने उपवास धरले आहेत. शिरड गावात फकीर बाबाची दर्गा आहे, लग्न झालेले जोडपे या दर्गावर दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारी दर्गा, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.
हिंदू मुस्लिम एकता :शिरड येथील फकीरबुवा या देवावर माझी भक्ती आहे. दर गुरुवारी आम्ही दर्शनासाठी जातो. पवित्र रमजान महिन्यात मी शेवटचे पाच दिवस रोजा ठेवते. तसेच माझ्यासोबत काही महिलाही रोजा ठेवतात. अशी प्रतिक्रिया शिरडमधील गावकरी महिला लक्ष्मीबाई कनवाळे यांनी दिली. मागील तीन वर्षांपासून मी रमजान महिन्यात संपूर्ण ३० दिवस रोजा ठेवते. या रोजाच्या काळात मी दररोज शेतात जाते. रोजा ठेवल्याने एक प्रकारचा आनंद मिळतो, असे सिंधु हिंगाडे नावाच्या महिलेने सांगितले. देशात सध्या हिंदू मुस्लिम द्वेषाचे वातावरण आहे, तरीहा महाराष्ट्रातील तसेच नांदेड जिल्ह्यातील शिरड हे गाव मात्र यास अपवाद ठरले आहे. या गावात सर्व धार्मिक उत्सव हिंदू मुस्लिम एकतेने साजरे केले जातात.
हेही वाचा : Ramzan Eid 2023 : कधी आहे रमजान ईद, का साजरी करण्यात येते रमजान ईद