नांदेड - अगोदरच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे केळीला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने बळीराजा संकटात आहे. तसेच केळीला कवडीमोल भाव मिळत आहे. अशा अडचणीत शेतकरी सापडला असतानाच आता केळीच्या बागांनातापमानाचा मोठा फटका बसला आहे. तामपमानामुळे केळीच्या बागेची पाने करपली आहेत.
तापमानाचा केळीच्या बागांना फटका, बागांची पाने करपली - तापमानाचा केळीच्या पिकावर परिणाम
केळीच्या बागांना तापमानाचा मोठा फटका बसला आहे. तामपमानामुळे केळीच्या बागेची पाने करपली आहेत.

जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून उन्हाचा पारा चढला असून, त्याचा परिणाम केळीच्या बागांवर दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे केळीचे झाडे वाळण्यास सुरुवात झाली आहे. तसेच उन्हाच्या तिव्रतेमुळे केळीची झाडे अर्ध्यातून मोडून, बागांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. मागील चार दिवसांपासून तापमान ४४ ते ४५ अंशांपर्यंत गेल्याने केळीच्या बागांना तापमानाचा फटका बसला आहे. त्याचबरोबर वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने विहीर व बोअरवेलवर वीज पंप चालत नाहीत. त्याचाही परिमाण केळीच्या बागावर होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
केळीच्या बागांना पाणी मिळत नसल्याने झाडे अर्ध्यातून मोडून पडत आहेत. योग्य काढणीच्या वेळी तापमानात वाढ झाल्याने केळीच्या झाडाचे वजन कमी भरत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. गत वर्षात अर्धापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड झाली होती. तसेच केळीचे बाग चांगली बहरली होती. थोड्या प्रमाणावर थंडीच्या लाटेचा केळीच्या बागावर परिमाण झाला होता. थंडीत अनेक रोगराईने ग्रासले होते. शेतकऱ्यांनी पोंगे भरण करून केळीला पूर्णपदावर आणले. थंडीच्या लाटेत शेतकऱ्यांना केळीच्या बागावर मोठ्या प्रमाणावर खत व फवारणीचा खर्च करावा लागला होता. त्यानंतर वादळी वाऱ्यात काही प्रमाणात केळीचे नुकसान झाले होते. अशा अनेक संकटातून सावरलेल्या केळीच्या बागा मात्र उन्हाच्या तिव्रतेमुळे पुन्हा संकटात सापडलेल्या दिसून येत आहेत. ४५ अंशाच्या पुढे गेलेल्या तापमानामुळे व पाणी कमी मिळत असल्याने झाडे अर्ध्यातून मोडून पडत आहेत. त्यामुळे केळीच्या झाडाचे वजन कमी भरत असून त्याचा उत्पन्नावर परीणाम होत आहे.
अगोदरच कोरोनामुळे केळीला कवडीमोल दर मिळत आहे. ५००ते ६०० रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. परंतु, तापमानामुळे केळीच्या बागेचे नुकसान होत असल्याने ऐनवेळी शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास तापमानामुळे हिरावून घेतला आहे.