नांदेड : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नांदेड जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. तर काल रात्रीपासून अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे. गेल्या २४ तासांत बिलोली तालुक्यातील आदमपूर महसूल भागात २१३.७५ मिमी, तर संपूर्ण मराठवाडा विभागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.
जिल्ह्यात काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती : बिलोली तालुक्यातील हरनाळी, माचणूर, बिलोली, गोळेगाव, आरळी, कासारआळी, बेलकोनी, कुंडलवाडी आणि गांजगाव या 12 गावांतील सुमारे 1,000 रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पावसामुळे या गावांमध्ये अचानक पाण्याची पातळी वाढली, ज्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. महसूल विभागाचे कर्मचारी आणि बचाव पथकांनी गुरुवारी संध्याकाळपासून बचाव कार्य सुरू केले जे रात्री उशिरापर्यंत सुरू चालू होते. या गावांमधील वस्त्या आणि शेतात पाणी शिरल्याने लोकांना स्थलांतरित करण्यात आले, आहे. तर सुटका करण्यात आलेल्या लोकांना, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तात्पुरता निवारा देण्यात आला आहे.
अशी आहे पावसाची नोंद : पावसाचे मोजमाप करणाऱ्या मराठवाड्यातील 468 मंडळांपैकी 40 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यापैकी ३६ मंडळे एकट्या नांदेड जिल्ह्यातील असल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या अहवालात म्हटले आहे. आदमपूर आणि नरंगल बुद्रुक मंडळात 24 तासांच्या कालावधीत अनुक्रमे 213.75 मिमी आणि 210.75 मिमी पाऊस झाला आहे. 18 मंडळांमध्ये 100-200 मिमी पाऊस झाला, तर इतर 16 मंडळांमध्ये 65-100 मिमी पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे 83 मिमी, तर हिंगोली जिल्ह्यातील आखाडा येथे 94.50 मिमी, टेंभुर्णी 78.75 मिमी, येहळेगाव येथे 85.75 मिमी पावसाची नोंद 24 तासांत झाली आहे.
महाविद्यालयांना सुट्टी जाहीर: नांदेड शहराजवळील विष्णुपुरी धरणाचा एक दरवाजा गुरुवारी रात्री 11.30 वाजता उघडून 12,924 क्युसेक पाणी सोडण्यात आले. मात्र, शुक्रवारी सकाळी ६.४५ च्या सुमारास दरवाजा बंद करण्यात आला. परंतु मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीवर बांधलेले धरणाचे दरवाजे पुन्हा एकदा सकाळी 11.45 वाजता उघडण्यात आले आणि 11,688 क्युसेक पाणी सोडण्यात आले, नांदेडमध्ये अतिवृष्टीचा भारतीय हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट पाहता, जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती.
हेही वाचा -
- Nanded Rain: पुरात अडकलेल्या शाळकरी मुलांची जेसीबीच्या साहाय्याने सुटका, पाहा व्हिडिओ
- Maharashtra Rain: राज्यात पावसाच जोर राहणार कायम, 'या' 3 जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांत अतिवृष्टीची शक्यता
- Koyna Dam : चिपळूणच्या पुरामुळे कोयनेची वीजनिर्मिती बंद; वीजनिर्मितीचा पुराशी काय आहे संबंध? घ्या जाणून