नांदेड -हिमायतनगर तालुक्यात 4 दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे ( Heavy rain in Nanded ) वडगाव येथील पुलावरुन पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वडगाव येथील गावांचा शहरांशी संपर्क तुटला ( villages lost contact with city ) आहे. तेथील दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान खाण्या पिण्याच्या वस्तू, अन्नधान्य, शाळेतील विद्यार्थी आणि आजारी रुग्णांना रुग्णालयात नेताना रेल्वे पटरीच्या मार्गाने हिमायतनगर गाठावे लागत आहे. कंधार तालुक्यात पाण्यात दोन जन वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
पुलाची उंची वाढवण्याची मागणी -गेल्या अनेक वर्षापासून वडगाव येथील पुलाची उंची वाढवून तलावातील गाळ काढण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून वारंवार केली जात आहे. हिमायतनगर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आदिवासी पट्ट्यात असलेल्या गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, सवना, पिछोण्डी, वडगाव, वडगाव तांडा, बुरकुलवाडी, खैरगाव, खैरगाव तांडा, वाळकी, वाळकी तांडा, या गावासह परिसरात सततच्या पावसामुळे नदी, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. त्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे. वडगावजवळील पुलावरुन पाणी वाहत असल्याने दोन दिवसापासून वडगावचा संपर्क तुटला आहे.
सुना तलाव ओव्हरफलो - वडगावच्या पिण्याच्या पाण्याची तसेच सिंचनाची भिस्त असलेला सुना तलाव तुडूंब भरला असून, ओव्हरफ्लो ( Suna Lake overflow ) झाला आहे. गाव परिसराला पुराच्या पाण्यामुळे वेढा बसला आहे. या सुना प्रकल्पातील सांडवा 202 मीटर असून, त्याची उंची 1 मीटरने वाढवण्यासाठी शासनाची सीमारेषा आणखी शिल्लक आहे. तलावाला दोन कॅनॉल असून, उजवा कॅनॉल 12 किलोमीटरचा तर डावा कालवा 6 किलोमीटरचा आहे. तसेच तलावाची पाळू 2 हजार 840 मीटर आहे. आज घडीला या तलावात झाडे झुडपे वाढली असून, गाळ साचला असल्याने कॅनॉल दुरुस्ती झाली नसल्याने व्यवस्थावपन बिघडून पाऊस जास्त झाला की, तलाव ओव्हरफलो होऊन गावचा मार्ग बंद पडत आहे. दरम्यान, सुना तलावाच्या सांडव्यातून येणाऱ्या पाण्यामुळे वडगावकडे जाणाऱ्या नाल्याचा पूल लहान असल्याने मुसळधार पावसामुळे पाणी नाल्यावरुन वाहू लागले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून गावचा संपर्क तुटला आहे. गतवर्षी आलेल्या पुरात एक ऑटो वाहून गेला होता. पण सुदैवाने सर्वजण सुखरुप बचावले. अशा घटना पुन्हा होऊ नयेत, म्हणून येथील पुलाची उंची वाढवून तलावातील गाळ काढावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.