नांदेड- शहरासह जिल्ह्यात रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मेघ गर्जनेसह वादळी पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांना उष्णतेतून थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र, यामध्ये फळबागांसह, उन्हाळी ज्वारी, भुईमूग, हळद, केळी व भाजीपाल्यांचे नुकसान झाले आहे. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली होती. त्यातच शनिवारी आणि रविवारच्या वादळी वारा व पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वीज पडून शेतकऱ्यांची जनावरे ठार झाली आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण
रविवारी सायंकाळी वादळी पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. शनिवारी (दि.१) सायंकाळी जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट झाला. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचाही पाऊसही पडला. रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक वादळ-वाऱ्याला सुरुवात झाली आणि काही भागात एक तासाच्या वर जोरदार पाऊस बरसला. जवळपास जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अर्धापूर, मारतळा, लोहा, हदगाव, उस्माननगर, बरबडा, मुदखेड आणि भोकरमध्ये सर्वाधिक नुकसान झालेले आहे.
भोकर तालुक्यात वीज पडून चार शेळ्या ठार
भोकर तालुक्यातील पोमनाळा येथील शेतकरी बाबू यशवंत सूर्यवंशी यांच्या दोन तर गोविंद रामा मोरे यांच्याही दोन बकऱ्या वीज पडून दगावल्या आहेत.