नांदेड - गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने दोन दिवसांपासून या परिसरात जबरदस्त हजेरी लावली आहे. शुक्रवारी, शनिवार व रविवारी झालेल्या पावसाने या परिसरात चांगलीच दाणादाण उडविली आहे. तालुकाभरात सतत पडणाऱ्या पावसामुळे किरकोळ जनजीवन विस्कळीत झाले होते. माहूर तालुक्यात अनेक ओढे, नाले ओसंडून वाहत होते. दरम्यान, तालुक्यातील काही पुलावरुन पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतूक देखील ठप्प होती.
एकंदरीत नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सर्वत्र सुरू आहे. हदगाव, हिमायतनगर, बिलोली, किनवट, धर्माबाद, नांदेड, उमरी, नायगाव या तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला आहे. नांदेड तालुक्यात मात्र १५.६३ मिमी पाऊस झाला. सर्वसाधारण पाऊस नायगाव आणि उमरी तालुक्यात झाला आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वीच पेरण्या धरल्या होत्या. काही भागातील पेरण्या संपुष्टात आल्या आहेत. एकंदरी या पावसाने शेती पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.