नांदेड - अर्धापूर शहरातील आरके जिममध्ये बुधवारी (३० जून) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वेगवेगळ्या धर्मातील दोन युवकात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर याच वादातून रात्री साडेनऊच्या दरम्यान शहरातील मारुती मंदिर चौकात दोन गटात तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीत पोलिसांच्या गाडीसह अनेक चारचाकी व दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील जवळपास दोनशे ते अडिचशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून या प्रकरणातील १८ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अश्रूधुरांचा वापर, हवेत गोळीबार
शहरातील दोन युवकांच्या वादातून दोन्ही गटातील जमावामध्ये राडा झाला. दोन्ही गटातील तरूणांनी दिसेल ते वाहन, दुकान, पानटपरी, दवाखाना, मेडिकलची तोडफोड केली. तसेच मोठ्या प्रमाणात दगडफेकही केली. यात अनेक पोलीसही किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुरांचा वापर करावा लागला. तसेच हवेत गोळीबारही केला. त्यानंतर जमाव पांगला आणि शहरात शांतता प्रस्थापित झाली.
18 जण ताब्यात
पोलिसांनी आतापर्यंत याप्रकणी 18 जणांना ताब्यात घेतले आहे. तर, दोनशे ते अडीचशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. घटनास्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन कार्यवाहीसाठी योग्य त्या सुचना दिल्या आहेत.