महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पदवीधर मतदानाच्या केंद्रावर कोविड-19 च्या खबरदारीसाठी असणार आरोग्य कर्मचारी - नांदेड पदवीधर मतदान न्यूज

येत्या १ डिसेंबरला राज्यात पदवीधर मतदार संघांसाठी निवडणूक होत आहे. त्याची पूर्वतयारी अंतीम टप्प्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

collector meeting
जिल्हाधिकारी बैठक

By

Published : Nov 23, 2020, 8:36 PM IST

नांदेड -औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक मतदानासाठी नांदेड जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील सर्व 123 मतदान केंद्रावर कोविड-19 अंतर्गत योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. यासाठी प्रत्येक ठिकाणी 3 आरोग्य कर्मचारी कार्यरत असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. ग्रामीण भागात प्रत्येक मंडळनिहाय मतदान केंद्रे आहेत. कोविड-19 आजार सदृश्य अथवा कोणाला ताप व इतर आजाराची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी मतदान केंद्रावर स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्याच्या सुचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

खबरदारी घेऊन मतदान करावे -
कोविड-19मुळे ही निवडणूक इतर निवडणुकींपेक्षा आरोग्याच्यादृष्टिने जिल्हा प्रशासनासाठी आव्हानात्मक आहे. या काळात आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्याच्या उद्देशाने प्रत्येक बुथचे निर्जंतुकीकरण करण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. कोविड-19 च्या प्राथमिक चाचणीसाठी आवश्यक असणारे थर्मामीटर, ऑक्सीमीटर सर्व ठिकाणी देण्यात आले आहेत. मतदान केंद्रात जाण्या अगोदरच प्रत्येकाचे तापमान तपासले जाणार आहे. पदवीधर मतदारांनी योग्य ती खबरदारी घेऊन आपला मतदानाचा हक्क व कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यात आहेत 123 मतदान केंद्रे -
जिल्ह्यातील मतदारांसाठी मतदान सुलभ व्हावे यादृष्टीने मतदान केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण 123 केंद्रावर मतदान पार पडेल. यासाठी 907 अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या प्रत्येकाची प्राथमिक चाचणी केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details