नांदेड - लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलिसांनी कारवाई करत एका ट्रकमधून अंदाजे 18 लाख 72 हजार किंमतीचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत याबाबत अधिक माहिती अशी की, लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलिसांनी (के. ए. 38- 6482) हा ट्रक ताब्यात घेतला. या ट्रकची अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी तपासणी केली असता, जवळपास 18 लाख 72 हजार किंमतीचा गुटखा ट्रकमध्ये आढळून आला.
याप्रकरणी आरोपी रुखमोद्दिन इमाम इमानदार ( वय - 28, रा पडसावली ता. आळंदा, गुलबर्गा) याच्या विरुद्ध माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड, सुनिल जिंतूरकर व नमुना सहायक अमरसिंग राठोड यांनी केली.
दरम्यान, प्रतिबंधित अन्नपदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. अन्नपदार्थाची कोणीही छुप्या, चोरट्या पद्धतीने विक्री, उत्पादन, साठा, वाहतूक करु नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.