नांदेड :मागील चार महिन्यांपासून जिल्ह्यातील रस्ते, शिक्षण, आरोग्य या विभागातील कामे निधीअभावी थांबली आहेत. अनेक प्रकल्पांना निधीची प्रतीक्षा आहे. तर जिल्हा नियोजन समितीच्या ( District Planning Committee ) कामांचेही नियोजन बाकी आहे. अशी एकंदर कोट्यवधी रुपयांची कामे रखडली असून, पालकमंत्री गिरीश महाजन ( Guardian Minister Girish Mahajan ) यांच्या दौऱ्यातून या कामांना हिरवा कंदील मिळेल, अशी आशा जिल्हावासीय बाळगून आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या दौऱ्यातून जिल्ह्याला काम मिळते, याचीच प्रतीक्षा लागली आहे.
विकास कामांना पालकमंत्र्यांच्या माध्यमातून गती:२०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्ह्याच्या विकास योजना तयार करण्यात आल्या. या योजनेंतर्गत अनेक कामे प्रस्तावित करण्यात आली होती. याशिवाय महानगरपालिकेच्या अखत्यारित शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामेही सुरू करण्यात आली होती. मात्र याच काळात जुलै महिन्यात राज्यात सत्तांतर झाले. महाविकास आघाडीचे सरकार पायउतार होऊन भाजप शिंदे गटाची सत्ता प्रस्थापित झाली, जिल्ह्यातील विकास कामांना पालकमंत्र्यांच्या माध्यमातून गती दिली जाते.
पालकमंत्र्याच्या जिल्हा दौऱ्याची जिल्ह्याला प्रतीक्षा : मात्र पालकमंत्र्यांची नियुक्तीसाठीही जिल्हावासीयांना मोठी प्रतीक्षा करावी लागली. अखेर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे पालकमंत्र्याच्या जिल्हा दौऱ्याची जिल्ह्याला प्रतीक्षा लागली होती. महिनाभरापूर्वी त्यांचा दौरा निश्चित झाला, ऐनवेळी हा दौरा रद्द झाला होता. आता ४ नोव्हेंबर रोजी गिरीश महाजन यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक होत आहे. त्यामुळे दौऱ्यात रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे काम महाजन यांच्याकडून होईल, अशी अपेक्षा आहे.
४०० कोटींचे नियोजन बैठकीत होणार निश्चित :जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील सर्व घटकापर्यंत लाभ पोहोचविला जातो. या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेत ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात गाभा क्षेत्रासाठी २५४ कोटी ८६ लाख आणि बिगर गाभा क्षेत्रासाठी १२५ कोटी ९३ लाख रुपयांची तरतूद आहे. गाभा क्षेत्रात कृषी, ग्रामविकास, सामाजिक व सामूहिक सेवा, पाटबंधारे व पूर नियंत्रण तर बिगरगाभा क्षेत्रात ऊर्जा, उद्योग, खाणकाम, सामान्य सेवा, सामान्य आर्थिक सेवा आदी घटकांचा समावेश आहे. त्यामुळे या घटकांसाठी केलेल्या आर्थिक तरतुदीतून कोणती कामे करावयाची? कुठे करावयाची, त्यासाठी निधीचे नियोजन पालकमंत्री महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे शुक्रवारच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये प्रस्तावित करावयाची कामे कोणत्या कामांना महत्व द्यायचे, या बाबींवर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर या कामांचे नियोजनही केले जाणार आहे. त्यामुळे बैठकीनंतरच प्रत्यक्षात कामांना वेग येणार आहे.
निधी दिला तरच गती :महानगरपालिकेने शहरात सुमारे दीडशे कोटी रुपयांची रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. मात्र हा निधी सरकारने थांबविल्याने कामे थांबली आहेत. शिवाय यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात अतिवृष्टीने रस्ते, पुलांची अतोनात हानी झाली. रस्ते वाहतुकीयोग्य राहिले नाहीत. अनेक ठिकाणी पूल वाहून गेले. रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला कोट्यवधी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. हा प्रश्नही पालकमंत्री मार्गी लावतील, अशी आशा आहे.