पालकमंत्र्यांनी केली जंबो कोविड केंद्राची पाहणी; तीन दिवसांत रुग्णसेवेत रुजू होणार....! - नांदेड कोरोना अपडेट
पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्हाधिकारी, इतर प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधींशी कोरोना परिस्थितीवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी तत्काळ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दूरध्वनी करून नांदेड जिल्ह्याला अधिक प्रमाणात रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
नांदेड- पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथील भक्ती लॉन्समध्ये युद्धपातळीवर उभारण्यात येत असलेल्या जंबो कोविड केंद्राची पाहणी केली. पुढील तीन दिवसांत हे केंद्र रुग्णसेवेत रुजू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पालकमंत्री चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी या कोविड केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन त्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. सुमारे २०० खाटांच्या या जंबो कोविड केंद्रामध्ये ऑक्सिजन तसेच बायपेप व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध असणार आहे. येथील सर्व सुविधांच्या उभारणीची त्यांनी विस्तृत माहिती घेतली.
रेमडेसिव्हिर तुटवडा संदर्भात आरोग्यमंत्री टोपे यांच्याशी चर्चा...!
पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्हाधिकारी, इतर प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधींशी कोरोना परिस्थितीवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी तत्काळ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दूरध्वनी करून नांदेड जिल्ह्याला अधिक प्रमाणात रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. टोपे यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याचे ते पालकमंत्र्यांना म्हणाले.
मदतीसाठी सेवाभावी संस्थानीपुढाकार घेण्याचे आवाहन...!
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच रुग्णालये व कोविड सेंटरच्या बाह्य व्यवस्थापनामध्ये सेवाभावी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यासंदर्भातही याप्रसंगी चर्चा झाली. कोरोना संदर्भात जनजागृती करणे, कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मदत करणे आदी कामांसाठी सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. यावेळी आ. अमर राजूरकर, आ. मोहन हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. बिपीन ईटनकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले आदी उपस्थित होते.