नांदेड -नांदेडमध्ये घडलेल्या शासकीय धान्य घोटाळ्यात ईडीने कारवाईला सुरूवात केली आहे. या कारवाईत इंडिया मेगा ऍग्रो कंपनीचे संचालक अजय बाहेती यांना ईडीने अटक केली आहे. मागील दोन वर्षांपूर्वी धान्य घोटाळा उघडकीस आला होता. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
शासकीय धान्य घोटाळा प्रकरण
'या' संचालकाविरुद्ध दाखल झाला होता गुन्हा-
कुंटुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एमआयडीसी भागात अजय बाहेती यांची इंडिया मेगा ऍग्रो अनाज या नावाची कंपनी आहे. या कंपनीत शासकीय धान्याची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांना मिळाली होती. त्यानंतर मीना यांनी वेगळे पथक नेमून या प्रकरणाचा छडा लावला. वेषांतर करून स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यात शासकीय धान्याचे ट्रक इंडिया मेगा कंपनीत जात असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणात पोलिसांनी कंपनीच्या संचालकासह धान्य पुरवठा आणि वाहतूक करणाऱ्या मंडळींवर गुन्हे दाखल केले होते.
या घोटाळ्यात १९ बड्या व्यापाऱ्यांचा समावेश
शासकीय धान्य घोटाळ्यात जिल्ह्यातील १९ मोठ्या व्यापाऱ्यांचा सहभाग होते. यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर तपासाचे चक्र फिरताच वेणीकर फरार झाले होते. काही महिन्यापूर्वीच बाहेती यांना जामीन मिळाला होता. त्यानंतर कंपनीत त्यांनी उत्पादनही सुरू केले होते. अनेक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर बाहेतीसह अन्य मंडळींची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर बाहेती यांनी परत आपल्या व्यवसायाला सुरूवात केली होती.
ईडीच्या कारवाईने शहरात खळबळ-
धान्य घोटाळ्यात आता ईडीने हस्तक्षेप केला आहे. नुकतेच ईडीने बाहेती यांना अटक केली आहे. बाहेती यांनी जवळपास तीन हजार रेशन दुकान आणि २७ गोदामाच्या माध्यमातून शासकीय धान्याचा घोळ घातल्याचा आरोप करीत मनी लॉड्रींंगच्या आरोपावरून बाहेती यांना ताब्यात घेतल आहे. त्यानंतर बाहेती यांना आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे आरोपींचे धाबे दणाणले आहेत. या घोटाळ्यात अनेक शासकीय अधिकारी सहभागी असल्याचे ईडीने नमूद केले आहे. त्यामुळे नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक होण्याची शंका व्यक्त केल्या जात आहे.
शेतकऱ्यांचेही केले कंपनीने फसवणूक-
बाहेती यांच्या कृष्णूर येथील इंडिया मेगा या कंपनीने शेकडो शेतकऱ्यांना देखील फसवल्याचे पुढे आले आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून त्यांचे पैसे बुडवून बाहेती महिना भरापासून फरार आहेत. आपले पैसे मिळावेत म्हणून शेतकऱ्यांनी कंपनीबाहेर आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही केले. परंतू त्याचा काहीही फायदा झाला नाही. आता तर धान्य घोटाळ्याचा तपास ईडीकडे गेल्याने शेतकऱ्यांचे पैसे कसे मिळतील ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
हेही वाचा -अनिल देशमुखांवर झालेली ईडीची कारवाई राजकीय नाही; करावे तसे भरावे - नारायण राणे