नांदेड: तोंडाला दस्ती बांधून दुचाकीवर आलेल्या तीन हल्लेखोरांनी वाहनांच्या काचा फोडल्या. (Gangsters Vandalism of 25 vehicles) हा कारनामा येथील एका सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेबाबत तीन संशयितांना विमानतळ पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (Gangsters rampage in Hanumangarh)
25 गाड्यांची तोडफोड: शहरातील हनुमानगड कमान या पत्रकार कॉलनी या भागात आता मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती झाली आहे. यात अनेकांकडे चारचाकी वाहनेसुद्धा आहेत. ज्यांच्याकडे पार्किंगसाठी जागा नाही, अशा रहिवाशीकडून आपली वाहने घरासमोर लावली जातात. मात्र शनिवारी सकाळी आपली वाहने पाहून अनेकाना धक्का बसला. शुक्रवारी रात्री मुख्य रस्त्यावर असलेला शुकशुकाट पाहून तीन हल्लेखोरांनी घराच्या समोर उभ्या केलेल्या जवळपास 25 गाड्यांची तोडफोड केली. तोंडाला दस्ती बांधून दुचाकीवर आलेल्या या तिघांनी दगड मारून या वाहनांच्या समोरील भागाच्या काचा फोडल्या.
तीन युवक ताब्यात:घटनेबाबत १६ वाहनधारकांनी विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे हनुमानगड परिसरातील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. अज्ञात हल्लेखोरांनी दहशत निर्माण करण्यासाठी हा प्रकार केला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर घटनेबाबत पोलिसांनी शनिवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर घटनेबाबत अज्ञात तीन युवकांना पोलीस ठाण्यामध्ये बोलावून त्यांची चौकशी करण्याचे काम सुरू होते. विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अद्याप आरोपींनी घटनेची कबुली दिली नाही अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक गौड़ यांनी दिली.