नांदेड- शहरात राहणाऱ्या मालमत्ताधारकांना महापालिकेने खुशखबर दिली आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे कराची थकबाकी आहे, त्यावरील शंभर टक्के शास्तीमाफी (दंड) करण्याचा निर्णय ३० सप्टेंबरपर्यंत करण्यात आला होता. त्यास मुदतवाढ देण्यास आली असून ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा -
नांदेड महापालिकेच्यावतीने मालमत्ता तसेच पाणीपट्टी आणि इतर करवसुलीसंदर्भात आयुक्त माळी यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. त्यात वाढ करुन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराची चालू मागणी तसेच थकबाकी देखील भरावी, असे आवाहन आयुक्त लहुराज माळी यांनी केले.
महापालिका हद्दीत जवळपास एक लाख १५ हजार मालमत्ताधारक असून त्यांच्याकडे जवळपास २०५ कोटी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. त्यामध्ये ६५ कोटी रुपयांची मालमत्ता कराची शास्ती आहे. त्याबरोबर चालू वर्षाची ५५ कोटी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. मालमत्ता कराची थकबाकी तसेच चालू मागणी भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत महापौर दीक्षा धबाले व पदाधिकारी आणि सदस्यांनी घेतल्याने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मागील वर्षी २०१८ - १९ मध्ये सर्वाधिक ४८ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली होती. आता या वर्षी ५५ कोटीचे उद्दिष्ट आहे. थकबाकी २०५ कोटी असून ती व चालू मागणी वसूल करण्याचे काम क्षेत्रीय कार्यालयनिहाय वसुली पथकामार्फत सुरू असल्याची माहिती उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी दिली.