नांदेड - जायकवाडी प्रकल्पातून 18,900 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. गोदावरी, पैनगंगा, पूर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
माजलगाव या मोठ्या प्रकल्पातून 4,800 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. पूर्णा प्रकल्पाच्या (येलदरी व सिध्देश्वर) पाणलोट क्षेत्रातून पूर्णा नदीत 11,600 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. या सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीला मिळते. त्याचा एकूण विसर्ग 37,100 क्युसेक्स आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास विसर्गात वाढ होऊ शकते. सद्यस्थितीत नांदेड शहरात पूर परिस्थिती नियंत्रणात आहे.
नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगण राज्यातील पोचमपाड धरण सुध्दा 98 टक्के भरले असून तेथून 1,50,000 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. पोचमपाड प्रकल्प 100 टक्के भरल्यास गोदावरी नदीत फुगवटा निर्माण होतो. सध्या विष्णुपुरी प्रकल्पात जायकवाडी प्रकल्पाचे पाणी पोहचले असून प्रकल्पाच्या 10 दरवाज्यातून 1,00,000 क्युसेक्सने विसर्ग चालू आहे. आवक वाढल्यास विसर्गात 1,50,000 क्युसेक्सपर्यंत वाढ करावी लागेल. सध्या जुन्या पुलावर पाणीपातळी 348.46 मीटर आहे.