नांदेड-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) मुख्य परीक्षा पास होऊनही मुलाखती घेतली जात नाही. या नैराश्यातून स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यानंतर राज्य शासनावर टीका होत आहे. त्यांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र शासनाने २५ लाख रुपये मदत करून लोणकर कुटुंबीयातील एकाला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भातील मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख याबाबत बोलताना स्थानिक तहसीलदार यांना निवेदन देताना भाजप तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष आत्माराम राजेगोरे, रयत क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संगिता कोल्हे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष जेठण पाटील-मुळे, भाजप शहराध्यक्ष विलास साबळे, अमोल कपाटे, उपसरपंच अरविंद पांचाळ, संतोष पवार, विजयमाला लांडगे, चंद्रकला घुले आदी उपस्थित होते.
'एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका'
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने नैराश्यात गेलेल्या स्वप्निल लोणकर या तरुणाने पुण्यात राहत्या घरी आत्महत्या केली. पुण्यात त्याने गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने एक पत्र लिहिले होते. ज्यात परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नसल्याने होत असलेल्या वेदनांना वाट मोकळी करुन दिली. त्यात त्याने लिहिले की, 'एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका'. स्वप्नीलचे शिक्षण पूर्ण झाल्यापासून तो एमपीएससीच्या परिक्षेची तयारी करीत होता. तो २०१९च्या पूर्व व मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र, गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे त्यांची मुलाखत झाली नव्हती. त्याबरोबर त्याने २०२०मध्येही एमपीएससीची परिक्षा दिली होती. त्यातील पूर्व परिक्षा तो उत्तीर्ण झाला होता. वाढते वय आणि नोकरी करुनही कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या सुसाईड नोटवरुन दिसून येत आहे.
अजित पवारांकडून घोषणा -
एमपीएससीचा परिक्षार्थी स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत सोमवारी चांगलाच गाजला. यावरील चर्चेला उत्तर देताना एमपीएससीची सर्व पदे 31 जुलै 2021 पर्यंत भरणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदनात केली. स्वप्नीलच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही प्रक्रिया थांबविण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी सदनात दिली.
या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून स्वप्नील सुनील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही घटना अत्यंत दुर्देवी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सध्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कार्यप्रणाली पाहता त्याचे पुनरावलोकन होणे गरजेचे आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगात अनेक जागा रिक्त आहेत. मात्र त्या जागा अद्यापही भरल्या गेलेल्या नाहीत असेही त्यांनी सांगितले. राज्यातले तरूण मोठ्या आशेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत असतात. मात्र दोन-दोन वर्ष मुलाखती होत नसल्याने तरुणांमध्ये निराशा येत आहे. राज्यात भाजपाचे सरकार असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आम्ही स्वायत्तता दिली, मात्र आता या स्वायत्ततेचा स्वैराचार केला जातो आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आला आहे.
अमित ठाकरेंकडून सांत्वन -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी या प्रकरणानंतर केडगाव येथे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी अमित ठाकेर म्हणाले, बातम्यांमध्ये वाचले की महाराष्ट्र शासनाची २ लाख पदे रिक्त आहेत. मग हे सरकार झोपले आहे का? की असे काहीतरी घडल्यानंतरच पाऊल उचलण्यासाठी सरकारला येणार, असा सवाल मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपस्थित केला. मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांचा धनादेश देत मदत केली आहे. तसेच कोणत्याही प्रकारची मदत लागली तर केव्हाही संपर्क साधा, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
कोल्हापुरातही आंदोलन -
स्पर्धा परीक्षा देणारा स्वप्नील लोणकर हा राज्य सरकारच्या धोरणाचा बळी ठरला आहे. समाजात असे अनेक स्वप्नील आहेत, त्यांना न्याय देण्याची गरज आहे. राज्य सरकारने स्वप्नीलच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करावी, अशी मागणी करत कोल्हापुरात भाजपाने सोमवारी (5 जुलै) राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकाराविरोधात जोरदार निदर्शने केली. कोल्हापुरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य सरकारने 2185 तरुणांच्या नियुक्त्या रखडवल्या आहेत. परीक्षा होऊन देखील अद्याप नोकरीवर सामावून घेतलं नाही. त्यामुळे राज्यसेवेच्या परीक्षा देणाऱ्या तरुणांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळेच स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली. याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच लोणकर यांच्या कुटुंबीयांना पन्नास लाखांची मदत द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली.