महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये घटस्फोटित प्रेयसीचा लग्न मंडपात राडा, वधू पक्षाच्या नातलगांनी बोहल्यावरच दिला नवरदेवाला चोप - नवरदेव

नांदेडमध्ये लग्न मंडपात बोहल्यावर चढू पाहणाऱ्या वरासोबत माझा विवाह झाला असल्याचे सांगत प्रेयसीने राडा केला. विवाहपूर्व संबंधाचे बिंग फुटल्यावर वधू पक्षाकडून संतप्त नातेवाईकांनी नवरदेवासह त्याचा भाऊ व वडिलांची धुलाई करत पोलिसांना पाचारण केले. या संबंध प्रकरणामुळे नवरीघरी निर्माण झालेला पेचप्रसंग सोडविण्यासाठी समाजातील प्रतिष्ठितांनी मध्यस्थी केली आणि नातेसंबंधातील अन्य मुलास राजी करून याच मंडपात नवरीचा शनिवारी सायंकाळी विवाह लावून दिला.

लग्न मंडपात प्रेयसीचा धुडगूस

By

Published : Jun 16, 2019, 10:19 AM IST

Updated : Jun 16, 2019, 12:52 PM IST

नांदेड - मंडपात विवाह सोहळ्याची लगबग सुरू असतानाच, बोहल्यावर चढणाऱ्या वरासमवेत माझा विवाह झाला असल्याचे सांगून प्रेयसीने राडा केला. विवाहपूर्व संबंधाचे बिंग फुटल्यावर वधू पक्षाकडून संतप्त नातेवाईकांनी नवरदेवासह त्याचा भाऊ आणि वडीलांची धुलाई करत पोलिसांना बोलावले. या संपूर्ण प्रकरणामुळे नवरीघरी निर्माण झालेला पेचप्रसंग सोडविण्यासाठी समाजातील प्रतिष्ठितांनी मध्यस्थी केली आणि नातेसंबंधातील अन्य मुलास राजी करून याच मंडपात नवरीचा शनिवारी सायंकाळी विवाह लावून दिला.

कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथील रहिवासी असलेला मुलगा अरविंद जगदेवराव साखरे याचा विवाह शहरातील कौठा येथील मुलीशी जुळला होता. १५ जून रोजी कौठा भागातील एका मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांनी विवाह मुहूर्त काढण्यात आला होता. दरम्यान, शनिवारी सकाळी वऱ्हाडाचे वाजत-गाजत स्वागत झाल्यावर आहेराचा कार्यक्रम पार पडला. लग्न सोहळा काही क्षणावर असताना एक तरुणी विवाह मंडपात काही जणांसोबत येऊन धडकली.

वरपक्षाकडील मंडळी या मुलीसमवेत काहीतरी चर्चा करत असल्याचे पाहून उपस्थितांनी चौकशी केली. त्यावेळी विवाह मंडपात विवाहबद्ध होणाऱ्या वरासोबत माझा विवाह झाला असल्याची बतावणी करत आपली फसवणूक झाल्याचे तरुणीने सांगितले. तसेच विवाहपूर्व संबंधाचे काही पुरावेही या तरुणीने उपस्थितांना दाखविले. यावेळी खुलासा करताना नवरदेवाने तरुणीसोबत विवाहपूर्व संबंध असल्याचे मान्य केले. यानंतर संतप्त झालेल्या वधुपक्षाकडील मंडळींनी नवरदेव, त्याचा भाऊ आणि वडीलांची धुलाई केली.

या प्रकाराची कुणकुण लागताच वरपक्षाकडील नातेवाईकांनी लग्नमंडपातून काढता पाय घेतला. वाढत असलेला गोंधळ पाहून नगरसेवक राजू काळे यानी नवरदेव, त्याची प्रेयसी व वधूपक्षकडील प्रमुख व्यक्तींना सोबत घेऊन कार्यालय गाठले. पोलिसांना पाचारण करून याबाबत माहिती दिली. नवरदेवाचा ज्या नियोजित वधूसोबत विवाह होणार होता त्यांची आर्थिक स्थिती हालाखीची आहे. शिवाय मुलीला पितृछत्र नसल्याने आता विवाह कसा होणार याची चिंता कुटुंबीयांनी व्यक्त केली. यावेळी नातेवाईकांनी चर्चा करून जवळच्या नातेसंबंधात उपवर मुलास लग्नासाठी राजी केले. त्यानंतर याच मंडपात नववधूचा विवाह लावण्यात आला.

नवरदेवासोबत आपला विवाह झाला असल्याची बतावणी करणारी प्रेयसी, विवाहित असून त्या पतीपासून तीला ६ वर्षाची मुलगीदेखील असल्याची बाब चौकशीत समोर आली. पतीसोबत घटस्फोट झाल्याने अरविंदसोबत तीचे सुत जुळले होते. आजचे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले खरे मात्र परस्पर समेटाने ते सुटल्याने गुन्हा नोंद झाला नसल्याची माहिती सुत्रांकडून समजते.

Last Updated : Jun 16, 2019, 12:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details