नांदेड : अराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाचे आज घराघरात आगमन होत आहे. जिल्ह्यात कोरोना आणि ओल्या दुष्काळाच्या संकटातही नागरिकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या मूर्तीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होताना दिसत आहे. आज मंगलध्वनी, आरती आदी भक्तिमय वातावरणात लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. पुढील दहा दिवस उत्तरोत्तर उत्सव रंगत जाणार आहे. कोरोना आणि ओल्या दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी भक्त बाप्पाच्या चरणी प्रार्थना करत आहेत.
कोरोनामुळे बाजारात शुकशुकाट
लाडक्या गणरायाचे आज शहरातील अनेक घरांमध्ये आगमन होत आहे. दिवसभर बाप्पासाठी घराघरात लगबग असणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे बाजारात मर्यादित गर्दी असली तरी त्यात मोठा उत्साह दिसून येत आहे. अनेकजण गणरायाची आवडती मूर्ती खरेदी करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांपासून तर चिमुकल्यांपर्यंत सर्वांनीच गणरायाच्या आगमनासाठी घरात सजावट केली आहे.