नांदेड -वीरजवान सुधाकर शिंदे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. छत्तीसगड येथे माओवाद्यांच्या हल्ल्यात शिंदे यांना विरमरण आले होते. आयटीबीपीच्या 45 वी बटालीयन आणि महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना सलामी दिली. सुधाकर शिंदे यांच्यावर त्यांच्या मूळगावी मुखेड तालुक्यातील बामणी येथे अंत्य संस्कार करण्यात आले.
१० वर्षीय मुलाने दिली मुखाग्नी -
सुधाकर शिंदे यांचे पार्थिव आज सकाळी बामणी येथे पोहचले. गावकरी आणि प्रशासनातर्फे अंतिम संस्काराची तयारी करण्यात आली होती. शिंदे इंडो तिबेटीयन बटालियनमध्ये असिस्टंट कमांन्डन्ट या पदावर कार्यरत होते. छत्तीसगड येथे नारायणपूरजवळ माओवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात सुधाकर शिंदे हे शहीद झाले होते. शिंदे यांचे शालेय शिक्षण मुक्रामाबाद येथील डॉ. भाऊसाहेब देशमुख विद्यालयात घेतले. त्यानंतर परभणी कृषी विद्यापीठातून सन २०००मध्ये कृषी विषयाची पदवी घेतली. २००१मध्ये आयटीबीटी विभागात सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाले. २०१९ मध्ये छत्तीसगड राज्यात नक्षली प्रतिबंधक पथकात त्यांची नियुक्ती झाली. शिंदे यांची घरातील परिस्थिति अत्यंत गरीबीची होती. सुधाकर सुट्टीतसुद्धा गावाकडे आल्यावर कायम देशसेवेचे गोष्टी करत होते. दरम्यान, त्यांच्या पार्थिवाला 10 वर्षीय मुलाने मुखाग्नी दिली. तसेच शहीद शिंदे यांच्या पार्थिवावरील तिरंगा झेंडा कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाणही उपस्थित होते.