नांदेड- करोना या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी सरकारने लोकडाऊन घोषित केले आहे. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर दिसून येत आहे. सर्व दळण-वळणाची साधने बंद असल्याने लोहा तालुक्यातील बोरगाव येथील एका फळबाग उत्पादकाचे तब्बल २० लाखाचे नुकसान झाले आहे.
किशन गायकवाड यांनी २०१४ मध्ये संत्र्याची बाग लावली. गायकवाड यांनी संत्र्याची तब्बल हजार झाडे लेकरासारखी वाढवली आहेत. कोरडा दुष्काळ असो की, आणखी काही संकट, गायकवाड यांनी नेहमी झाडांची निगा राखली आहे. संत्रा बागेच्या मशागतीसाठी त्यांना दरवर्षी २ लाख रुपये खर्च करावे लागतात, तेव्हा जाऊन फळे काढणीसाठी येतात. इतकी मेहनत घेऊनही कधी ओला दुष्काळ तर कधी कोरड्या दुष्काळामुळे बळीराजा संकटात सापडतोच. यावर्षी शेतीसाठी पोषक वातावरण असताना करोनाच्या संसर्गाने बळीराजा संकटात सापडला आहे.