नांदेड- जिवंत महिलेला मृत दाखवून तिचा म्हाडातील गाळा आपल्या नावावर करुन घेत फसवणूक केल्याचा प्रकार नांदेड येथे उघड झाला आहे. या प्रकरणी सहाहून अधिक जणांविरुध्द शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हाडाच्या गाळयासाठी जिवंत महिलेला दाखवले मृत; 6 जणांविरुद्ध गुन्हा - sumedh bansode,
जिवंत महिलेला मृत दाखवून तिचा म्हाडातील गाळा आपल्या नावावर करुन घेत फसवणूक केल्याचा प्रकार नांदेड येथे उघड झाला आहे

शहरातील गोकुळनगरमधील रहिवासी व सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मीबाई रामलू अनंता (वय ६५ वर्षे) या महिलेचे पती रामलू यांच्या नावे शहरातील लेबर कॉलनीमधील म्हाडा गाळा क्रमांक २१/२८६ हा आहे. परंतु, शहरातील रहिवासी शंकर शिंगे, सुजाता शंकर, कपिल शंकर, प्रियंका शंकर, कोमल आनंद जाधव, मोहम्मद आमेर अब्दुल रशीद व म्हाडा कार्यालय नांदेडमधील अधिकारी, कर्मचारी व म्हाडाच्या औरंगाबाद कार्यालयातील नाव परिवर्तन करणारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करुन फिर्यादी लक्ष्मीबाई यांच्या पतीच्या नावे असलेला म्हाडाचा गाळा परिवर्तन करण्याबाबत खोटे कागदपत्र तयार करुन नाव परिवर्तन करुन घेतले.
हा सर्व प्रकार दि. १५ ऑक्टोबर २०११ ते २३ मे २०१६ च्या दरम्यान आरोपींनी केला. फिर्यादी जिवंत असतानाही पालिकेकडून मृत्यू प्रमाणपत्र काढून कोणीही वारस जिवंत नाही, असे खोटे कागदपत्र तयार केले. आर्थिक लाभापोटी फसवणूक केली. याबाबत लक्ष्मीबाई रामलू अनंता यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी कलम ४२०, २६४, ४६५, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे हे करीत आहेत.