नांदेड - गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात गाजत असलेल्या नवी दिल्ली येथील निजामुद्दीन भागातील तबलिगी मरकझमध्ये आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले १४ जण नांदेडचे आहेत. ते सर्व जण नांदेडात दाखल होते. त्या १४ जणांचा शोध घेऊन त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली आहे.
दिल्लीतील निजामुद्दीनहून नांदेडात आलेले १४ जण शासकीय रुग्णालयात दाखल
निजामुद्दीन मशिदीमध्ये 'तबलीग-ए-जमात' या मुस्लीम धर्म प्रचारक संघटनेने आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी देश-विदेशातून असंख्य जण सहभागी झाले होते.
कोरोना विषाणू संसर्गाच्या वातावरणामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी नवी दिल्ली येथे गेल्या तीन दिवसांपूर्वी निजामुद्दीन मशिदीत मोठा जमाव जमल्याचे प्रकरण उघडकीस आले होता. निजामुद्दीन मशीदीच्या 'तबलीग-ए-जमात' या मुस्लीम धर्म प्रचारक संघटनेने आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी देश-विदेशातून असंख्य जण सहभागी झाले होते.
देशात सर्वत्र जमावबंदी असताना निजामुद्दीन मशिदीत इतक्या मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने लोकांना धक्काच बसला. त्या लोकांची तपासणी केली असता त्यांच्यापैकी तब्बल २४ जणांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले. इतकेच नव्हे तर इज्तेमा आटोपून आपआपल्या राज्यात शेकडो लोक परत गेले होते. त्यांच्यापैकी १४ जण नांदेड जिल्ह्यातील असून त्यांना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेऊन सर्वांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भरती केले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून आज रात्रीपर्यंत त्यांचे रिपोर्टही उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.