नांदेड (किनवट) - किनवट शहरापासून दक्षिणेकडे 15 किलोमीटर अंतरावरील पाटोदा या गावाच्या वळण रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांकडून सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी (30 ऑगस्ट) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तेलंगणात जाणाऱ्या राज्य मार्गावरील चिखली फाटा ते पाटोदाच्या मधील दहेगावजवळ एका मोटार सायकलवरून शेख करीम खान हुसेन (वय 30 वर्षे), गौस अकबर शेख (वय 29 वर्षे), हासीनाबी शेख गौस (वय 26 वर्षे) व शेख सलीम शेख गौस (वय 6 वर्षे, सर्व रा. इस्लामपुरा, ता. किनवट) हे चौघे जण एका मोटार सायकलवरून किनवटवरून सोनाळा येथे जात होते. समोरून गणेश माधव चव्हाण (वय 30 वर्षे), गोकुंदा व अंकुश दत्तराम जाधव (वय 32 वर्षे, सर्व रा. मलकापूर, ता. खेर्डा, ह.मु. रामनगर, किनवट) दोघे मोटार सायकलवरून सोनाळ्याकडून किनवटकडे येत असताना समोरासमोर या दोन दुचाकींची जोरदार धडक झाली.
या धडकेत अंकुश दत्तराम जाधव (वय 31 वर्षे) व गौस अकबर शेख (वय 29 वर्षे) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर शेख करीम खान हुसेन (वय 30 वर्षे) व शेख सलीम शेख गौस (वय 6 वर्षे) या दोघांचा आदिलाबाद येथे उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
गणेश माधव चव्हाण व हासीनाबी शेख गौस हे गंभीर जखमी असून पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथील दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार कांबळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी सदरील घटनेचा पंचनामा करून यातील घटनास्थळी मृत झालेल्या दोघांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणून शवविच्छेदनासाठी पाठवले.
दोन दुचाकींची समोरासमोर धडक, चौघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी - किनवट अपघात बातमी
किनवट शहरापासून 15 किमी अंतरावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना उपचारासाठी नेताना वाटेत मृत्यू झाला. दोघांची परिस्थीती गंभीर असून त्यांच्यावर आदिलाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संग्रहित छायाचित्र