नांदेड - आंदोलनात वाहनांची तोडफोड करणे उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. वाहनांची तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या माजी महिला आमदार आणि जिल्हा प्रमुखासह 19 जणांना नांदेड न्यायालयाने तब्बल पाच वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी एक लाख साठ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. नांदेडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. ई. बांगर यांनी मंगळवारी ही शिक्षा सुनावली आहे.
एसटी चालकाची तक्रार - लातूर एस. टी. आगाराची एस. टी. गाडी घेवून चालक हवगीराव शिवमुर्ती टिपराळे हे 7 जून 2008 रोजी सकाळी 6.45 वाजता नांदेडला पोहचले. त्यांच्या गाडीचा क्रमांक एम.एच.20 डी. 8827 असा होता. त्यांची गाडी हिंगोली गेटच्या खुराणा ट्रॅव्हससमोर आली असता रस्त्यावर आंध्र प्रदेशची एस.टी. क्रमांक ए.पी. 28 झेड. 2316 यातील प्रवाशी खाली उतरून पळताना दिसत होते. त्यावेळी आपण आणि वाहकाने गाडीत प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. तोपर्यंत शिवसेना कार्यकर्त्यांनी हातात दगड, काठ्या, लाठ्या, गजाळ्या घेवून बेकायदेशीरपणे सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यास सुरुवात केली. यानंतर हवगीराव टिपराळे यांनी दिलेल्या तक्रारीत एकूण 5 नावे होती आणि इतर 20 ते 22 शिवसैनिक असा उल्लेख होता.
वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा -याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 146/2008 भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 341, 147, 148, 143, 149, 427 आणि 336 सह क मालमत्ता नुकसान कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक व्ही. एच. सूर्यवंशी यांच्याकडे तपास देण्यात आला होता. त्या दिवशी एस. टी. गाडी क्रामांक एम.एच.20 डी.5917, एम.एच.20 डी.7348, एम.एच.20 डी. 6812, एम.एच.40-9623, एम. एच. 40-8125, एम.एच.20 डी. 5173 तसेच महानगरपालिकेची चार चाकी वाहन क्रमांक एम.एच. 26 बी.445 तसेच पोलीस गाडी क्रमांक एम.एच.26 एल.273 एवढ्या गाड्यांचे नुकसान करण्यात आले होते. तसेच बऱ्याच पोलीस अंमलदारांना, पोलीस अधिकाऱ्यांना दगडफेकीत मार लागला होता.
यांना देण्यात आली शिक्षा - या प्रकरणी माजी आमदार अनुसयाबाई खेडकर, महेश खेडकर, जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे, सहसंपर्क प्रमुख भुजंग पाटील, नरहरी वाघ, बालाजी शिंदे, नवनाथ भारती, माजी पंचायत समिती सभापती व्यंकोबा रोगडे, भुजंग कावळे, बालगीर गिरी, दौलत पोकळे, बाळू तिडके, शिवाजी सूर्यवंशी, श्रीकांत पाठक, सुभाष शिंदे, भैया शर्मा यांच्यासह ठाकरे गटातून भाजपात गेलेले दिलीप ठाकूर, संदीप छपरवार, मनोज यादव यांना शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा - Hasan Mushrif Petition Reject : हसन मुश्रीफ यांना अटक होणार? जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला